इगतपुरी रेल्वे स्थानकांत पादचारी पूल आणि इतर कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने रविवापर्यंत विशेष ‘मेगाब्लॉक’ घेतल्यामुळे भुसावळ-मुंबई, गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाडय़ा कसारा रेल्वे स्थानकात दोन ते तीन तास थांबवून ठेवण्यात येणार आहेत. या एकूणच परिस्थितीमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांना मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे.

उन्हाळ्याची सुटी आणि लग्न मुहूर्त यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत असतांनाच या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मनस्तापाला तोंड द्यावे लागणार आहे. शनिवारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर आणि रविवारी मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. रविवारी कुर्ला-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस तसेच भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. एलटीटी-अलाहाबाद आणि मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस या गाडय़ा दिवा, वसई रोड, जळगावमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

काही गाडय़ांच्या वेळेत बदल  

एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस कसारा रेल्वे स्थानकांत ८.३५ ते ११.१० पर्यंत, एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस ९.४० ते ११ वाजेपर्यंत खर्डी रेल्वे स्थानकात, तर मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस आटगाव रेल्वे स्थानकात १० ते १०.५८ या वेळेत थांबविण्यात येणार आहे. रविवारी मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस ही गाडी सीएसएटी येथून सकाळी ६.१० ऐवजी नऊ वाजून पाच मिनिटांनी सुटेल. एलटीटी कामख्या एक्स्प्रेस ७.५० ऐवजी नऊ वाजता मार्गस्थ होईल. शनिवारी नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकापर्यंत येईल. रविवारी सुटणारी मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस गाडी नाशिक रोड रेल्वे स्थानकांतून सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.