जळगाव : मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे- पाटील यांना समर्थन करण्यासाठी जिल्ह्यातून सकल मराठा समाजातर्फे नेत्यांसह मंत्र्यांना गावबंदी तसेच मेणबत्ती फेरी, उपोषण केले जात आहे. गावागावांतून विविध पदाधिकारी पदाचे राजीनामे देत आहेत. मराठा आरक्षण तातडीने द्यावे, या मागणीसह जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शहरात सकल मराठा समाजातर्फे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास मेणबत्ती फेरी काढण्यात आली. मराठा आरक्षणाला विरोध करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचाही निषेध करण्यात आला. मेणबत्या पेटवून शिवरायांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आल्या. यावेळी सकल मराठा समाजाचे राम पवार, हिरामण चव्हाण, सुनील गरुड, वाल्मीक पाटील, संजय चव्हाण यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते.
जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत समाज शांत बसणार नाही, असे समाजबांधवांनी सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रा. डी. डी. बच्छाव यांनी सांगितले की, आरक्षण नसल्यामुळे समाजातील मुलांना चांगले गुण मिळवूनही संधी न मिळाल्याने ते मागे पडत आहेत. राज्यातील सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांकडे डोळेझाक करीत आहे. जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू असून, सरकार त्याकडेही लक्ष द्यायला तयार नाही. सरकार केवळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा : नाशिक जिल्हा दूध संघाच्या जमीन विक्री व्यवहारात २० लाखांचा अपहार; संचालकांसह सनदी लेखापालाविरोधात गुन्हा
भुसावळ तालुक्यातील खडका येथे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर आमले यांनीही जरांगे-पाटील यांना पाठिंब्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार संजय सावकारे यांनी आमलेंशी चर्चा केली. मात्र, मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली आहे. सोमवारपासून आमलेंनी जलत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमलेंची भेट घेत समर्थन दिले जात आहे.
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी नाशिकमध्ये आज मशाल फेरी
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे सकल मराठा समाजातर्फे गुणवंत शेलार यांचे साखळी उपोषण, तर शिरसगाव येथे दिलीप पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कजगाव येथील ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी पदाचे राजीनामे सरपंच रघुनाथ महाजन यांच्याकडे दिले. त्यात पल्लवी पाटील, समाधान पवार, शोभाबाई बोरसे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख दिनेश पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे दिगर व आडगाव, तसेच जळगाव तालुक्यातील धानवड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ‘कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही…!’ असे आवाहन करणारे फलकच गावाच्या वेशीवर लावण्यात आले आहे.