मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाविषयी जनजागृतीसाठी रविवारी जिल्ह्य़ात नाशिकरोड, कळवण, येवलासह ठिकठिकाणी दुचाकी फेरी काढण्यात आली. मुंबईतील मोर्चात मोठय़ा संख्येने सामील होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोपर्डी घटनेतील संशयितांना फाशी द्यावी, मराठा समाजास आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासह इतर अनेक मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने मुंबईत बुधवारी मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईचा मोर्चा ऐतिहासिक होण्याच्या दृष्टीने राज्यात सर्वत्र तयारी करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रविवारी नाशिक जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी दुचाकी फेरी काढण्यात आली. युवकांसह महिलांचा लक्षणीय सहभाग हे या फेरीचे वैशिष्टय़ ठरले. येवला येथे बाजार समिती आवाराजवळून निघालेली दुचाकी फेरी विंचूर चौफुली, आझाद चौक, पटेल कॉलनीमार्गे निघून तात्या टोपे आणि शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फेरीचा समारोप झाला. यावेळी मोर्चात पाळावयाच्या आचारसंहितेची माहिती देण्यात आली.
कळवण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी १० वाजता जनजागृती दुचाकी फेरी काढण्यात आली. कळवण बस स्थानक परिसरातून निघालेली ही फेरी मेनरोड, मानूर, कळवण बाजारपेठ, गांधी चौक, गणेश नगर, नाकोडा, रवळजी, देसराणे, गणेश खेडगाव, ककाणे, विसापूर, बिजोरे, भादवण, पिळकोस, जुनी बेज, नवी बेज, बगडू, भेंडी, निवाणेमार्गे कळवण अशी काढण्यात आली. नाशिकरोड येथेही दुचाकी फेरी काढण्यात आली.