लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानातंर्गत नांदगाव पंचायत समितीत ‘अमृत कलश’ यात्रेप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व्यासपीठावरून बोलत असतांना मराठा आरक्षण प्रश्नावर आमच्याशी बोला, असा आग्रह धरत ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. सैनिकांच्या स्मरणार्थ आणि देशाच्या एकतेशी संबधित कार्यक्रमात गोंधळ घालू नका, हे चुकीचे आहे. आपल्याशी चर्चा करा. संविधनिक पद्धतीने प्रश्न मार्गी लावू, असे सांगत आंदोलकांना पवार यांनी व्यासपीठावरूनच सुनावले.

आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात तीन बनावट डॉक्टर जाळ्यात

कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री पवार यांची आंदोलकांनी भेट घेत चर्चा केली. गोंधळ घालून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी समज मंत्री पवार यांनी आंदोलकांना दिली. नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथून निघालेल्या या पदयात्रेत डॉ. भारती पवार यांचेसह तहसील, पंचायत समिती कार्यालयातील तसेच इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यात्रा तहसील.कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीचे कलश व्यासपीठासमोर ठेवण्यात आले. मंत्री पवार यांचे हस्ते कलश पूजन करण्यात आले. शहीद जवानांच्या माता-पिता,पत्नीचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, कृषी अधिकारी डमाळे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha protestors shout at amrit kalash yatra in nandgaon trying to show black flags to bharti pawar mrj