मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे (केबीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅककडून सर्वोच्च असे (ए प्लस प्लस) मानांकन मिळाले. दुसरीकडे पतमापन करणाऱ्या क्रिसिलने मविप्र शिक्षण संस्थेला ए हे मानांकन दिले आहे. या संस्थेच्या अंतर्गत सुमारे ४७५ शाळा, महाविद्यालये असून तब्बल दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. नव्या शैक्षणिक धोरणानुसार केवळ केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयास स्वायत्तता मिळवायची की शिक्षण संस्थेचे स्वायत्त विद्यापीठात रुपांतर करायचे, हा पेच संस्थाचालकांसमोर उभा आहे.
हेही वाचा- नाशिक : नव्या उपविभागाचा वादग्रस्त अधिकाऱ्याकडे कार्यभार ; ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सावळागोंध
केबीटी महाविद्यालयास नॅक मूल्यांकन समितीकडून दुसऱ्या फेरीत सर्वोच्च मानांकन मिळाल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक ॲड. आर. के. बच्छाव, ॲड. नितीन गुळवे आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत केवळ तीन महाविद्यालयांना नॅककडून हे मानांकन मिळाले. त्यात केबीटीचा समावेश आहे. याआधी संस्थेच्या चार महाविद्यालयांचे नॅककडून मूल्यांकन होऊन चांगले मानांकन मिळाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळवण्याचा विचार सुरू आहे. आयबीएमशी सहकार्य करून कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सायबर सुरक्षा संबंधित अभ्यासक्रम सुरू केले जातील. तसाच शैक्षणिक करार केंब्रिज विद्यापीठाशी केला जाणार आहे. पुढील दोन वर्षात केबीटी स्वायत्त महाविद्यालयात रुपांतरीत होईल, असा विश्वास संस्थाचालकांनी व्यक्त केला.
शिक्षण संस्थेचे स्वायत्त विद्यापीठात रुपांतरीत करण्याचे शिवधनुष्य कधी पेलायचे, याबद्दल निश्चिती नाही. कारण, संस्थेचे विद्यापीठात रुपांतर करायचे म्हटले तर प्रथम शैक्षणिक परिषदेसारखी परिषद स्थापन करावी लागेल. विषय तज्ज्ञ समाविष्ट करून अभ्यासक्रमांची रचना करावी लागणार आहे. प्रत्येक क्षेत्राची मागणी, गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी करावी लागेल. हे आव्हानात्मक काम आहे. त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रथम बराच गृहपाठ करावा लागणार असल्याचे संस्थाचालक सांगतात. संस्थेत सत्तांतर झाल्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी घडत असून विद्यापीठ स्थापनाच्या अनुषंगाने विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- शेवटी आईचं काळीज! सिन्नरमध्ये बछड्यांना घेऊन जाताना मादी बिबट्या कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO
क्रिसिलकडून मानांकन
पतमापन करणाऱ्या क्रिसीलने मविप्र शिक्षण संस्थेला ए हे मानांकन दिल्याची माहिती ॲड. ठाकरे यांनी दिली. क्रिसिल ही जागतिक स्तरावर वैविध्यपूर्ण विश्लेषणात्मक कंपनी असून, मुख्यत्वे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग), संशोधन, जोखीम आणि धोरणात्मक सल्ला आदी सेवा ती प्रदान करते. वेळेवर मुद्दल आणि व्याज देयके करून कर्ज परतफेड करण्याच्या कर्जदाराच्या क्षमतेचे मूल्यांकन करते.