नाशिक : समाज माध्यमात अतिशय खालच्या पातळीवरून टीका होत असून लेखापरीक्षणाबाबत शासकीय यंत्रणेकडे अर्जफाटे केले जात आहेत. संस्थेच्या कारभाराशी संबंधित कोणत्याही विषयावर संवाद साधता येईल. सर्वसाधारण सभेत चर्चा करता येईल. त्यामुळे समाज माध्यमावरील अपप्रचार बंद करावा, असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले आहे. मविप्र विद्यापीठाची स्थापना, जीर्ण अवस्थेतील शाळा इमारतींचे नुतनीकरण, आंतरराष्ट्रीय संस्थांशी करार, रोजगार उपलब्ध करण्यासाठी केंद्र, संशोधन आणि अभ्यास केंद्राची स्थापना आदी संकल्पही यावेळी जाहीर करण्यात आले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. नव्या सत्ताधाऱ्यांची ही पहिलीच सभा होती. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या सभेत मोठी गर्दी झाली होती. सभागृहात जागा नसल्याने काही काळ गोंधळ उडाला. ॲड. ठाकरे यांनी गतकाळात झालेल्या कारभाराचे वाभाडे काढताना समाज माध्यमांवरून होणाऱ्या टीकेवर चिंता व्यक्त केली. संस्थेचा कारभार हाती घेतल्यानंतर आम्ही २९ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज फेडले. तसेच ३१ कोटींची बांधकामाची देणी दिली. या माध्यमातून ६० कोटींची देणी आर्थिक वर्षात फेडण्यात आली.
हेही वाचा : बबन घोलप यांचा उपनेतेपदाचा राजीनामा; ठाकरे गटाला धक्का, आज उद्धव ठाकरेंशी चर्चा
दुसरीकडे संस्थेच्या ठेवीत १० कोटींनी वाढ झाली. निवडणुकीआधी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी घाईघाईत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली होती. आमच्या कार्यकाळात ती दिली गेली. शिवाय नव्याने वेतनवाढ करण्यात आल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. संस्थेतील १२, ८१७ सेवकांपैकी ८२३२ सेवक विनाअनुदानित तत्वावर काम करतात. विनाअनुदानित सेवकांच्या वेतनावर संस्था दरवर्षी सुमारे १६५ कोटी २२ लाख खर्च करते. वेतनवाढीनुळे २०२३ -२४ पासून त्यात सुमारे २१ कोटींचा भार पडणार आहे. मागच्या काळात काही विशिष्ट आणि अनावश्यक बांधकामांवार वारेमाप खर्च करण्यात आला. परंतु, शाळांमध्ये अद्ययावत इमारती, शौचालय, अथवा स्वच्छ पिण्याचे पाणी या गरजेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले गेले. आजही संस्थेच्या काही शाळा भाडेतत्वावरील जागेत, मंदिरात, घरात आणि गोठ्यात भरत आहेत. अशा ठिकाणी आवश्यक सोई उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.
नवे संकल्प
भविष्यात संस्थेमार्फत मविप्र विद्यापीठाची उभारणी करण्याचा मानस आहे. आयबीएम आणि ऑक्सफर्डशी सामंजस्य करार, एनडीए प्रशिक्षण केंद्र, १३ मजली अद्ययावत मुलांचे वसतिगृह, मध्यवर्ती कार्यालयासमोरील वाहनतळाच्या जागेत बहुमजली वाहनतळ, दीड हजार आसन क्षमतेचे सभागृह, सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी सहाय्य केले जाणार आहे. मॅरेथॉन चौकात धावपटू कविता राऊत यांचा पुर्णाकृती पुतळा, मविप्र मॅरेथॉनला पुन्हा सुरूवात, आयुर्वेद, पशुवैद्यक, दंतवैद्यक आदी नवीन महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा : हतनूर धरणाचे १८ दरवाजे दीड मीटरने उघडले; तापीच्या पातळीत वाढ
अमृता पवार, प्रणव पवार यांना झटका
सभेत मागील सत्ताधाऱ्यांनी संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी म्हणून अमृता पवार यांची केलेली नियुक्ती आणि प्रणव पवार, अमृता पवार यांना करोना योध्दा म्हणून गौरविण्याचे विषय फेटाळण्यात आले. काही वर्षांपूर्वी स्वायत्त विद्यापीठ स्थापन करण्याच्या विषयावर चर्चा झाली होती. परंतु, तेव्हा स्वायत्त विद्यापीठ स्थापन करू नये, असा ठराव झाला आहे. संस्थेची गुणवत्ता तपासणीचे निश्चित झाले होते. याची आठवण माजी संचालक डॉ. विलास बच्छाव यांनी सभेत करून दिली.