सध्या पौष्टिक खाद्यसंस्कृती आणि खवय्यांचीही संख्या वाढते आहे. बर्गर-पिझ्झाप्रमाणेच गायीचे दूध, सेंद्रिय भाजीपाला, धान्य यांची आवडही उध्र्वगामी दिशेने वाटचाल करत आहे. ओटस् वगरे परदेशी पौष्टिक धान्यांप्रमाणेच ‘नाचणी’ही भाव खाऊ लागली आहे. रत्नागिरी-शिरगाव येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात सात वर्षांपूर्वी हीच पारंपरिक आवड जपण्याच्या दृष्टीने हालचाली झाल्या आणि त्या प्रयत्नातून निर्माण झाला लाल भाताचा सुधारित वाण. या संशोधनामुळे लाल तांदळाचे उत्पादन वाढेलच, पण कोकणातील भातशेतीलाही नवे आयाम मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील भातशेती तोटय़ात; पण पौष्टिक लाल तांदूळ कितीही दराने घ्यायला लोकं तयार! मग येथे लाल भाताचेच उत्पादन का घेतले जात नाही. पांढरा गावठी भातच का पिकवत राहिले शेतकरी, असा प्रश्न उपस्थित होतो. याचे कारण लाल भात पिकवणे अतिशय अवघड आहे. कोकणात म्हाडी, बेला, वालई, पटणी असे विविध लाल भाताचे वाण लोकप्रिय आहेत. यात सर्वच उंच वाढणारे. त्यांचे तृण उंच वाढल्याने ते खाली पडून जमिनीवर लोळतात. त्यामुळे हा भात लावायचा आणि शेत नशिबावर सोडून द्यायचे, एवढेच शेतकऱ्यांच्या हाती राहते. त्यातही बियाणे बदल न झाल्याने याचे उत्पन्न आता हेक्टरी पाच क्विंटलवर आले आहे. साहजिकच मागणी आणि दर असूनही शेतकरी या शेतीपासून दूरच राहतात. गरोदर मातांना, छोटय़ा बालकांना, रुग्णांना या लाल भाताची पेज आरोग्यदायी ठरते, म्हणूनच स्वत:ची कौटुंबिक गरज भागवण्यापुरतेच या भाताचे उत्पन्न घेण्याची प्रथा कोकणात सध्या सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पांढऱ्या भाताचे अनेक वाण प्रसारित केल्यानंतर आता आपला मोर्चा लाल भाताकडे वळवला आहे. यावर्षी त्यांनी लाल भाताची रत्नागिरी-७ ही सुधारित जात प्रसारित केली आहे. आणखी दोन-तीन वर्षांत या वाणांमध्ये आणखी भर पडण्याचे सूतोवाचही कृषी शास्त्रज्ञांनी केले आहे. त्यामुळे भविष्यात पांढऱ्या गावठी भाताऐवजी लाल भाताचीच शेती लोकप्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.

मुळात तृणातील अन्न लोंब्यातील दाण्यात पोहोचल्यानंतर पारंपरिक लाल भाताचे तृण कमजोर होते. उंच वाढलेले हे तृण आणि त्यावर लोंब्यांचे वजन असतानाच पाऊस किंवा वाऱ्याने मधल्यामध्ये तुटून जमिनीवर लोळू लागते. आधी शेतकऱ्यांच्या गोठय़ात मोठय़ा प्रमाणात गुरे असल्याने उंच वाढणाऱ्या या भाताच्या पेंढय़ाचा उपयोग पशुखाद्य म्हणून होत असे. पण कोकणात दिवसेंदिवस गोठे रिकामी होऊन शेतकरी आधुनिक तांत्रिक शेतीकडे वळू लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भातपेंढय़ाची उपयुक्तता त्याच्या दृष्टीने कमी होऊ लागली आहे. साहजिकच लाल भाताचे उत्पादन नगण्य आणि पेंढा भरपूर या समीकरणाला शेतकऱ्यांनी आता नकार दिला आहे.

साहजिकच दीडशे सेंटीमीटर एवढे उंच होणारे हे भातपीक बुटक्या जातीत आणणे गरजेचे होते. गेली सात वष्रे शिरगावच्या कृषी विज्ञान केंद्रातील भात व भुईमूग संशोधन प्रकल्पात लाल भाताच्या बुटक्या वाणावर संशोधन सुरू होते. त्याला यंदा यश येऊन १०० ते ११० सेमीपर्यंत वाढणारे लाल भाताचे वाण या केंद्राचे प्रमुख डॉ. भरत वाघमोडे आणि त्यांच्या सहकारी कृषी शास्त्रज्ञांनी निवड पद्धतीने शोधून काढले आहे. त्यामुळे उंच वाढून जमिनीवर लोळणार नाहीच, पण खोडही लवचीक असल्याने वाऱ्या-पावसाने भात जमिनीवर पडण्याची भीती कायमची दूर झाली आहे. या वाणाची रोगप्रतिकारकशक्ती जास्त असल्याने नुकसानीचे प्रमाणही कमी होते. भात तयार होण्याचा कालावधीही १२०-१२५ दिवसांचा म्हणजेच मध्यम स्वरूपाचा आहे.

रत्नागिरी-७ असे नामकरण झालेल्या या भाताचे उत्पादनही पांढऱ्या भाताप्रमाणेच म्हणजेच ४०-५० क्विंटल हेक्टरी एवढे येते. त्यामुळे लाल भाताचे उत्पादनही हुकमी घेण्याची संधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. या भाताकडे पाहण्याचा आणखी एक नकारात्मक दृष्टिकोन म्हणजे दाणा लांबट जाड असणे. सध्या बारीक तांदळाची सवय झालेल्यांना या जाड तांदळाचा भात जमत नाही. पौष्टिकपणामुळे एखाद दिवस त्याचा भात, पेज अथवा इतर पदार्थ करून खाल्ले जातात. साहजिकच ही उणीव दूर करण्यातही कृषीशास्त्रज्ञांना यश आले आहे. निवड पद्धतीने विकसित केलेल्या या रत्नागिरी-७ वाणातील दाण्याचा आकार आखूड जाडा आहे. अनेक पांढऱ्या भाताचे वाण या आकाराचे असतात. त्यामुळे या वाणाला कोकणात पसंती मिळण्याची शक्यता आहे. या भाताला मागणी आणि वाढीव दर मिळण्याचे कारण म्हणजे यामध्ये असलेली जीवनसत्त्वे. रत्नागिरी-७ या वाणामध्ये लोह (१५.४ पीपीएम) आणि जस्ताचे (३० पीपीएम) प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोप्लेविन, डायटरी फायबर याच्या अंतर्भावामुळेही या भाताचा पौष्टिकपणा वाढलेला आहे. साहजिकच आता कोकणात सर्वत्र लाल भाताची शेती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. वाघमोडे यांनी सांगितले, लाल भाताच्या प्रसाराची आता सुरुवात झाली आहे. यात यश नक्की मिळणार. आता लवकरच वेगवेगळी वैशिष्टय़ असलेले इतर लाल भाताचे वाणही विकसित करण्याचा प्रयत्न आहे. हे वाण सध्या कोकणासाठी शिफारस होणार असून त्याचे राष्ट्रीय स्तरावरही निरीक्षणे नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यात यशस्वी झाल्यास कोकणचा लाल भात संपूर्ण देशभरात प्रसिद्ध होईल, यात शंका नाही.

– राजगोपाल मयेकर

rajgopal.mayekar@gmail.com

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on red rice