मुंबई मराठी साहित्य संघ नाटय़शाखा आणि दि गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या कै. दामू केंकरे स्मृती नाटय़ोत्सवात नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरम प्रस्तुत ‘हंडाभर चांदण्या’ नाटकाची निवड झाली आहे. मुंबई महोत्सवात नाटक सादर होण्यापूर्वी नाशिक येथे ६ व ७ मे रोजी त्याचा प्रयोग नाशिककरांसाठी होणार असून या माध्यमातून संकलित होणारा निधी दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यासाठी वापरला जाणार आहे.
या बाबतची माहिती सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली. मुंबई साहित्य संघ मंदिर येथे होणाऱ्या नाटय़ महोत्सवात ८ मे रोजी दुपारी ४ वाजता ‘हंडाभर चांदण्या’चा प्रयोग होणार आहे. प्रमोद गायकवाड यांची निर्मिती असून दत्ता पाटील यांचे लेखन व सचिन शिंदे यांचे दिग्दर्शन आहे. या महोत्सवात गडय़ा आपुला गाव बरा, ज्युलिएट अॅण्ड रोमिओ, इन्शाल्लाह, असूरवेद, संगीत प्रीतीसंगम ही नाटके सादर होणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन ५ मे रोजी नाटय़ संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, दि गोवा हिंदूचे रामकृष्ण नायक, नाटय़ निर्माते प्रसाद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हंडाभर चांदण्यामध्ये पाण्याची भीषणता वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. लोक संगीताच्या प्रभावी माध्यमातून सद्य:स्थितीवर उपहासात्मक भाष्य करण्यात आले. यात प्राजक्ता देशमुख, प्रणव पगारे, दीप्ती चंद्रात्रे, नूपुर सावजी, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, देव चक्रवर्ती, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. तांत्रिक बाजू लक्ष्मण कोकणे, ईश्वर जगताप, राहुल गायकवाड, प्रफुल्ल दीक्षित, श्रद्धा देशपांडे, माणिक कानडे आदींनी सांभाळल्या.
दरम्यान, सोशल नेटवर्किंग फोरमने या नाटकाचा प्रयोग खर्च वगळून उरलेली रक्कम दुष्काळग्रस्त गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील महोत्सवापूर्वी ६ व ७ मे रोजी नाशिक येथे प्रयोग होणार आहेत. ६ तारखेला दुपारी १२.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे दिशा फाऊंडेशनच्या वतीने निमंत्रितांसाठी प्रयोग होईल. तर ७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रयोग होणार आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न टंचाईग्रस्त गावासांठी निधी म्हणून संकलित केला जाणार आहे. अलीकडेच फोरमच्या माध्यमातून तोरंगणसह सहा गावांचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यात आला आहे.
पुढील काळात या प्रश्नावर अधिकाधिक काम करून दुष्काळग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा