अस्मानी संकट असो वा सुलतानी.. त्याचा खंबीरपणे मुकाबला करणारा बळीराजा त्या विरोधात उभाही ठाकतो. मात्र, कधीकधी संकटांसमोर मान तुकवत आत्महत्येचा पर्याय स्विकारतो. त्याच्या जाण्याने कुटूंबियांसमोर उभी राहणारी प्रश्नांची मालिका, त्यांना होणारा त्रास.. अशा सर्व प्रश्नांचा वेध घेऊन ‘शिरपूर पॅटर्न’सह इतर काही पर्याय शेतकरी वर्गाला जगण्याची नवी दिशा दाखविणारा ‘उम्मीद’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती निमार्ता दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रोहिणी वाघ, त्र्यंबक गायकवाड, दीपक शिवदे आदी उपस्थित होते. आशा फाऊंडेशनच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबांचे वास्तववादी चित्रण करणारा ‘उम्मीद’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात त्याचे चित्रीकरण होणार असल्याचे वाघ यांनी नमूद केले. साधारणत वर्षभरापासून या विषयावर विचार केला जात होता. सर्वाशी चर्चा करत आर्थिक गणिताची जुळवाजुळव करण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करताना त्या कोवळया विश्वात डोकावतांना प्रश्नांची मालिका, त्यामुळे होरपळणारे जीव जवळून पाहता आले. या प्रश्नांची धग शेतकऱ्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी चित्रपटाचे माध्यम निवडले आहे. यासाठी कोणत्याही कलाकार वा तंत्रज्ञाने मानधन घेतलेले नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांवर दृष्टीक्षेप टाकत असतांना त्यांना जगण्याचा नवा विचार देणारा हा चित्रपट आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जलस्त्रोत कसे वाढविता येतील, यासाठी अमरिश पटेल यांच्या शिरपूर पॅटर्नसह अन्य काही पर्याय सुचविण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.
चित्रपटाची निर्मिती लोक वर्गणीतून होत असून या माध्यमातून जी काही आर्थिक उलाढाल होईल त्यापैकी ५० टक्के रक्कम ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, संगोपन करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम या संस्थेला देण्यात येणार आहे. तसेच उर्वरीत रक्कम नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
चित्रपटात आधारतीर्थच्या बालकांनी काम केले असून दीपक शिवदे यांचे दिग्दर्शन आहे. शिवदास अहिरे, त्र्यंबक गायकवाड कार्यकारी निर्माते असून अतुल-राहुल यांचे संगीत आहे. चित्रपटातील पाच गीतांना साधना सरगम, आदर्श शिंदे, राजा हसन, प्रिया भट्टाचार्य या गायकांचा स्वरसाज लाभणार आहे. दिलीप वाघ, पूनम पाटील या नवोदितांसह नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, अमरीशभाई पटेल, नसिरूद्दीन शहा, ओमपुरी, शबाना आझमी, नंदिता दास, माया जाधव, विक्रम गोखले आदींशी चर्चा सुरू असल्याचे वाघ यांनी सांगितले.
‘उम्मीद’मध्ये शिरपूर पॅटर्न
‘उम्मीद’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
Written by रोहित धामणस्कर
First published on: 01-10-2015 at 08:53 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie umeed