सटाणा येथील साहित्यायन संस्थेच्यावतीने २७ मार्च रोजी २४व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. माधुरी शानबाग भूषविणार असून, उद्घाटन मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते होणार आहे.
याबाबतची माहिती ‘साहित्यायन’चे अध्यक्ष प्रा. शं. क. कापडणीस यांनी दिली. सटाणा शहरातील राधाई मंगल कार्यालयात हे संमेलन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, अभिनेते दीपक करंजीकर, आ. दीपिका चव्हाण, जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील, सटाणा नगरपालिका नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनानिमित्त ‘साहित्यायनी’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. उद्घाटन सत्रानंतर दुपारी ‘अन्य भाषांमधील साहित्याचा मराठीत अनुदान होणे आवश्यक आहे-नाही’ या विषयावर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यात अभिमन्यू सूर्यवंशी, चंद्रकांत भोंजळ, स्वानंद बेदरकर सहभागी होतील. दुसऱ्या सत्रात कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार वितरण आणि काव्यसंमेलन होणार आहे. यावेळी कवी संजय चौधरी अध्यक्षस्थानी राहतील. काव्यसंमेलनात खलील मोमीन, प्रकाश होळकर, कमलाकर देसले, लक्ष्मण महाडिक, नंदन रहाणे, रवीद्र मालुंजकर, किशोर पाठक आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. संमेलन सर्वासाठी खुले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा