लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील आदिवासी, भूमिहीन, विधवा, अपंगांना शबरी योजनेतून घरकुल मिळावे, यासाठी मंगळवारी इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर एल्गार संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
इगतपुरी तालुक्यातील आदिवासी, भूमिहीन, विधवा, अपंग यांनी घरकुलासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. घरकुल योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी आदिवासी विकास विभागाकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र हे अर्ज अद्यापही पंचायत समितीने पुढील कार्यवाहीसाठी दिलेले नाहीत. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही पंचायत समिती कार्यालयाकडून कोणतेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.
आणखी वाचा-नाशिक : देवळालीत वाहनांची तोडफोड, दोन अल्पवयींनासह पाच संशयित ताब्यात
परिपूर्ण घरकुल प्रस्ताव तत्काळ आदिवासी विकास विभागाकडे पाठविण्यासंदर्भात पत्रदेखील त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र तरीदेखील शबरी घरकुल योजनेचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले नाहीत. इगतपुरी तालुक्यातील शेकडो पात्र आदिवासी कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळण्यासाठी त्यांचे प्रस्ताव पाठविण्यात यावे, यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची आरती करण्यात आली. सर्व प्रस्ताव त्वरीत न पाठविल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला