जळगाव : देशातील मणिपूर राज्य गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचारापासून धगधगत आहे. दोन महिलांना विवस्त्र करून धिंडही काढण्यात आली. या घटनेचा शहरातील महिला संघटनांतर्फे मंगळवारी मूकमोर्चा काढत निषेध करण्यात आला. दोषींना फाशी द्या, अशी मागणी करीत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील जी. एस. मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महापौर जयश्री महाजन, सरिता माळी-कोल्हे, मंगला पाटील, मंगला बारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध सामाजिक क्षेत्रातील संघटनांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मोर्चा क्रीडा संकुल चौकमार्गे नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिसांनी मोर्चाला प्रवेशद्वारावर रोखले.

हेही वाचा >>> मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी नंदुरबार जिल्हा बंद, आदिवासी संघटनांची हाक

प्रत्येक नारीची एकच पुकार न्याय मिळावा हा आमचा अधिकार, न्याय हवा- नको कारवाई भिक्षा- अत्याचाराला मरेपर्यंत फाशी हीच असेल एकमेव शिक्षा, महिलांना नसेल सन्मान तर देश तरी कसा बनेल महान, करू नका महिलांचे शोषण- नाहीतर देशाचे होईल कुपोषण, स्त्री हे देशाचे भाग्य- तिच्यावर होतो अन्याय हे तिचे नव्हे तर देशाचे दुर्भाग्य असे फलक हातात घेत महिला पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करीत न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली. महिला आता सुरक्षित नाहीत. आमचा आवाज दाबला जातोय. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू आहे. मात्र, देशभरात काय सुरू आहे, हे सत्ताधारी विसरले आहेत. केंद्र सरकारला काही गांभीर्य आहे का? राजकीय नेत्यांना  खुर्ची सोडावीशी वाटत नाही. खुर्चीसाठी राजकीय रस्सीखेच सुरू आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेचे काय? कोणत्याही गोष्टीचा सरकारकडून विचारच होत नाही, असा संताप महिला पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा >>> नाशिक : विशेष फेरीसाठी ४, ४८७ अर्ज; अकरावी प्रवेश प्रक्रिया

 देशविघातक प्रवृत्ती भारतीय लोकशाहीला लागलेली कीड आहे. या शक्ती जाणीवपूर्वक देशात विखारी वातावरण निर्माण करीत आहेत. समाजासमाजांत तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकाविणे व त्यातून आपले हेतू साध्य करून घेणे, हाच त्या शक्तींचा मुख्य प्रयत्न आहे. त्या दुर्दैवी महिलांत तर एक देशासाठी कारगिल युद्धात लढलेल्या वीर जवानाची पत्नी आहे. असे दुर्दैवी भाग्य त्यांच्या कपाळी लिहिणार्‍या या विघातक शक्तींना आवर घालण्यासाठी त्या घटनेस जबाबदार असलेल्या समाजकंटकांना त्वरित कठोर शिक्षा व्हावी. त्यांच्यावरील खटला हा जलद गती न्यायालयात चालवावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी प्रसाद यांना देण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March in jalgaon to protest the manipur incident ysh
Show comments