लोकसत्ता वार्ताहर

धुळे : शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान आणि रोहिणी या गावांच्या परिसरात छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीरपणे करण्यात येणारी गांजा शेती उघडकीस आणली. कापूस आणि तूर या पिकांच्याआड आंतरपीक म्हणून गांजा लागवड झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरज पावरा, रोहित पावरा, समीर पावरा आणि रसलाल पावरा (सर्व रा. रोहिणी, शिरपूर,धुळे) अशी संशयितांची नावे आहेत. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मिळालेल्या माहितीची खात्री केल्यावर बुधवारी सकाळी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकासह लकड्या हनुमान आणि रोहिणी गाव शिवारात छापा टाकला. या कारवाईत बेकायदेशीरपणे लागवड झालेला लाखो रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्याची कारवाई हाती घेण्यात आली.

आणखी वाचा-नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

ड्रोनच्या सहाय्याने गांजा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र पाहणे, त्याचे मूल्यमापन करण्याचे काम सुरु करण्यात आले. शिरपूर तालुक्यात याआधीही अनेक ठिकाणी गांजा शेती उघडकीस आली आहे. गांजा शेती प्रकरणी संबंधितांविरुध्द ठोस स्वरुपाची कारवाई होत नसल्याने शेतकरी गांजा शेतीकडे वळत असल्याचे दिसत आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.