नाशिक – निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे सुजाता भूषण निश्चित या २७ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या दीड वर्षाच्या बाळासह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
रामकृष्ण गाजरे यांची मुलगी सुजाताचा विवाह १९ जून २०१९ रोजी सोनेवाडी बुद्रुक येथील भूषण निश्चित यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरी सातत्याने छळ होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. माहेरून पैसे आणावेत, काम करत नाही, झोपून राहते, अशा वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने तिला त्रास दिला जात असे. या त्रासाला कंटाळून सुजाताने मंगळवारी रात्री त्यांच्या शेतातील शेततळ्यात दीड वर्षाचा मुलगा गुरु याच्यासह उडी घेत आत्महत्या केली. शेततळ्यामध्ये पाणी भरलेले असल्यामुळे चांदोरी येथून आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील स्वयंसेवकांनी शेततळ्यात उतरुन बुडालेल्या मायलेकाचे मृतदेह बाहेर काढले.
हेही वाचा >>>सिडकोतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
याप्रकरणी सुजाताचे वडील रामकृष्ण गाजरे यांनी निफाड पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचा सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी सुजाताचा पती, सासू-सासरे, दीर आणि जाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून संशयितांना ताब्यात घेतले आहे.
© The Indian Express (P) Ltd