नाशिक : सासरच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध सेवन करून विवाहितेने आत्महत्या केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. अश्विनी खताळे असे मयत महिलेचे नाव असून या प्रकरणी संशयित म्हणून पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावात राहणाऱ्या संशयित जालिंदर खताळे यांचा विवाह अश्विनीसोबत झाला. लग्न झाल्यापासून जालिंदरने आई द्रोपदाबाईच्या मदतीने अश्विनीचा छळ सुरू केला. चारचाकी वाहन घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करत शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून अश्विनीने शेतीकामासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध सेवन केले. हा प्रकार अन्य लोकांच्या लक्षात आला असता तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना तिचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. अश्विनीच्या वडिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संशयित जालिंदरला ताब्यात घेण्यात आले. सासु द्रोपदाबाई फरार आहे.
दुसऱ्या घटनेत, मालेगाव येथील कविता जाधव (३५) यांनी पती नितीन जाधव आणि अन्य नातेवाईक (रा. पुणे) यांच्याविरुद्ध पैशांसाठी मारहाण केल्याची तक्रार केली आहे. भूखंड घेण्यासाठी, व्यवसाय उभा करण्यासाठी, घराची वास्तुशांती करण्यासाठी वेळोवेळी सासरकडील मंडळींनी कविताकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे कविताच्या माहेरच्या मंडळींनी पुरविले. अन्य नातेवाईकांनी नितीन यास चिथावणी देत घराचा हप्ता भरण्यासाठी, मुलाच्या शाळेचे शुल्क भरण्यासाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैसे आणण्यास कविता यांनी असमर्थता दर्शविताच त्यांना मारहाण करत अंगावरील दागिने काढून घरातून हाकलून दिले. कविता यांनी पती नितीनविरुद्ध मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.