नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भडकलेली आग तसेच दाखल झालेल्या रुग्णवाहिका लक्षात घेता या घटनेत अनेकजण जमखी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मुंडे गाव या भागात जिंदाल कंपनी आहे. याच कंपनीला आज अचानकपणे आग लागली आहे. या आगीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथे अनेक रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या आहेत. याच कारणामुळे आगीमुळे अनेक कामगार जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
धुराचे लोट आणि आगीचा भडका
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली आहे. आगीचे स्वरुप भीषण असून धूर आणि आगीचे लोट दूरपर्यंत पसरले आहेत. कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.