जळगाव – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावानजीकच्या सुदर्शन पेपर मिलला रविवारी भीषण आग लागली. अग्नितांडवात पेपरसह यंत्रसामग्रीची राखरांगोळी झाली. सुनसगाव गावानजीक राजेंद्र चौधरी यांच्या मालकीची सुदर्शन पेपर मिल असून, तेथे ड्युप्लेक्स पेपरची निर्मिती होते. देशात मोजक्याच ठिकाणी या पेपरची निर्मिती होते. त्याअनुषंगाने पेपर मिलमध्ये या पेपरची निर्मिती झाल्यानंतर तो विदेशात पाठविला जातो. रविवार असल्याने पेपर मिल बंद होती. सकाळी अकराच्याच्या सुमारास मिलमध्ये आग लागली.
हेही वाचा >>> नाशिक : सराफी दुकानात चोरी करणाऱ्या तीन महिला ताब्यात
पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलला पडला. आगीची घटना समजताच परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जो तो मिळेल तेथून पाण्याचा मारा करीत होता. अग्नितांडवात पेपरसह यंत्रसामग्रीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलिसांना तसेच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. आग विझविण्यासाठी भुसावळ, दीपनगर, जळगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या बंबांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार सूरज पाटील, गणेश गव्हाळे, जगदीश भोई यांच्यासह पथकाने धाव घेतली. तलाठी जयश्री पाटील, मंडळ अधिकारी योगिता पाटील, महावितरण कंपनीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. आगीत सुमारे साडेचारशे टन ड्युप्लेक्स पेपर, कच्चा माल, यंत्रसामग्री आदींचे कोट्यवधींच्या साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत आगीचे कारण व नुकसानीचा अंदाज समजू शकला नाही.