मालेगाव -येथील द्याने भागातील दोन प्लास्टिक कारखान्यांना शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत तयार व कच्चा माल, यंत्र सामग्री मिळून सुमारे २५ लाखाची हानी झाली आहे. अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. आगीचे कारण समजले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा- नाशिक रेल्वेस्थानकात शालिमार एक्स्प्रेसच्या मालवाहू डब्याला आग
गोविंद शर्मा आणि विजय शर्मा यांच्या मालकीचे हे कारखाने आहेत. शुक्रवारी या कारखान्याना साप्ताहिक सुटी असल्याने कुणीही कामगार कामावर नव्हते. प्रारंभी एका कारखान्यातून रात्री १० वाजेच्या सुमारास धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर शेजारच्या कारखान्यालाही आगीने कवेत घेतले. यामुळे परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात बंबानी २५ फेऱ्या केल्या. तसेच मनमाड, सटाणा नगरपरिषद व सोमा टोल कंपनीचे बंब देखील दाखल झाले होते. सुमारे पाच तास हे अग्नि तांडव सुरु होते.
हेही वाचा- जळगाव: शरद कोळींविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आगीची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे, प्रांताधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, मनपाचे सहाय्यक आयुक्त राजू खैरनार व सचिन महाले, माजी नगरसेवक मुश्तकिम डीग्नीटी हे घटनास्थळी दाखल झाले. आग लागलेल्या कारखान्यांच्या शेजारी काही यंत्रमाग कारखाने आहेत. तसेच दुसऱ्या बाजूस गणेशनगर ही झोपडपट्टी आहे. आगीमुळे झोपडपट्टी तसेच या कारखान्यांनाही धोका निर्माण झाला होता. सुदैवाने आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.