मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर नादुरूस्त झाल्याने शनिवारी तब्बल १० तास वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी एकनंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. तत्पूर्वी रस्त्याच्या दूतर्फा पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. राज्य परिवहन महामंडळाच्या बसही अडकल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
शनिवारी सकाळी पाच ते सहा तास मालेगांव, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी या सर्वच महत्वाच्या गावांमधून होणारी वाहतूक ठप्प झाली. सकाळी सहाच्या सुमारास शहरातून जाणार्या या महामार्गाच्या रेल्वे उड्डाण पुलावर येवल्याकडून मालेगांवकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. ते जागीच थांबले. कंटेनर बाजूलाही घेता येत नसल्याने काही वेळात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. शालेय वाहने, बस, मालवाहतूक करणारी वाहने अडकून पडली. वाहनांची ही रांग येवला शहराच्याहीपुढे तर मालेगांवपर्यंत पोहोचली. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने दुचाकीस्वारांनाही फटका बसला. या महामार्गावरून अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर वाहतूक करतात.
हेही वाचा…लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे नेणाऱ्या महिलेचा अपघातात मृत्यू
चार महिन्यांपूर्वीच या महामार्गावर संरक्षक कठडा कोसळून हा रस्ता वाहतुकीसाठी तीन महिने बंद होता. त्याचे परिणाम संपूर्ण राज्याच्या वाहतुकीवर झाले होते. शिवाय या मार्गावर लहान-मोठे अपघात नेहमीच होतात. कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली.
© The Indian Express (P) Ltd