मालेगाव: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधित असल्याच्या संशयावरुन येथील इरफान दौलत नदवी (३५) या मौलानास मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. मालेगावमधील ‘पीएफआय’शी संबंधित ही दुसरी अटक आहे. न्यायालयाने नदवीला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरुन ‘पीएफआय’ ही वादग्रस्त संघटना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडावर आली आहे. त्याच अनुषंगाने गेल्या सप्टेंबर महिन्यात तपास यंत्रणांनी देशातील विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली होती. त्यावेळी येथील सैफुर रहेमान याचे नाव पुढे आल्याने दहशतवाद विरोधी पथकाने त्यास अटक केली. सैफुरला अटक झाल्यावर मौलाना नदवी याने पीएफआयचे समर्थन करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले होते. त्यामुळे नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी मौलाना नदवी आणि त्याच्या एका साथीदाराविरुध्द तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. तसेच मौलानाच्या एकुणच हालचालींवरही पोलीस यंत्रणा करडी नजर ठेऊन होत्या. त्यानुसार संशय बळावल्याने रविवारी रात्री त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली. मौलाना नदवी हा इमाम कौन्सिलचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले. तपास यंत्रणेने सोमवारी मौलाना नदवीला नाशिक येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
हेही वाचा: राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नाशिक मध्ये रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग
दरम्यान, सप्टेंबरमध्ये मालेगावसह राज्यातील वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) शी संबंधित सैफु रहेमान याच्यासह पाच जणांना तपास यंत्रणेने अटक केली होती. तेव्हा दहशतवाद कृत्यांमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली होती. या प्रकरणातील नदवी हा सातवा संशयित आहे. समाजमाध्यमातील एका गटावर चिथावणीखोर संदेश पाठवला गेला. जातीय संघर्ष घडवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. या संदर्भात त्याचा जबाबही नोंदविला गेल्याचे सांगितले जाते.