धुळे – शहरातील प्रभात नगर आणि विटाभट्टी भागातील महापालिकेच्या दवाखान्यांना अचानक भेट दिली असता कुलूप आढळून आल्याने संतप्त महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
हेही वाचा – “धरणगावसह जळगाव जिल्ह्यात पाच शहरांमध्ये एमआयडीसी”; मुख्यमंत्र्यांची घोषणा
परिसरातील नागरिकांनी दवाखान्यांकडील वैद्यकीय सेवांवर आक्षेप घेत महापौरांकडे तक्रारी केल्या. दवाखाना रोज वेळेवर उघडतोच असे नाही. खोकल्यावरदेखील औषधे वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी महापौर चौधरी यांच्याकडे केली. दवाखाना बंद असल्याचे दिसताच महापौर चौधरी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दवाखान्याची वेळ नेमकी काय आहे, याची माहिती घेतली. सकाळी आठ ते १२ आणि दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा अशी वेळ असल्याचे डॉ. शेख यांनी महापौरांना सांगितले. असे असतांना अद्यापही दवाखान्याकडे एकही कर्मचारी फिरकलेला नाही, असे सांगत महापौरांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.