मुंबई, ठाणे आणि मालेगाव पाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गोवरचा शिरकाव झाला असून येवला तालुक्यात पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह प्रशासनही सतर्क झाले आहे. या रुग्णाचा सकारात्मक अहवाल येण्यापूर्वीच तो उपचारांनी बरा झाला आहे. येवला तालुक्यातील विखरणी येथील हा रुग्ण आहे. सर्वेक्षणात गावात एकही संशयित आढळलेला नाही. ग्रामीण भागात अंगावर पुरळ व तापाचे रुग्ण शोधले जात आहेत. या मोहिमेत वेगवेगळ्या तालुक्यांत २१ संशयित आढळले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. दुसरीकडे प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील बालकांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हेही वाचा >>>नाशिक: कार्डधारित अपंगांना प्रवास मोफत पण, तिकीट काढणे बंधनकारक; सिटीलिंक प्रशासनाचा निर्णय
मालेगावमध्ये मागील तीन महिन्यांत गोवरचे जवळपास ५० रुग्ण आढळले आहेत. मालेगाव वगळता इतरत्र गोवरचे रुग्ण आढळले नव्हते. येवल्यात रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागातही या आजाराने शिरकाव केल्याचे दिसत आहे. बाधित रुग्ण १७ वर्षाचा युवक आहे. ११ नोव्हेंबरला तो भिवंडीहून प्रवास करून घरी परतला होता. म्हणजे गोवरचा उद्रेक झालेल्या भागातून त्याच्या प्रवासाचा इतिहास आहे. येवला उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. या काळात नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रुग्ण बरा झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. नंतर त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नेहाते यांनी दुजोरा दिला. तत्पुर्वीच विखरणी गावात सर्वेक्षणाद्वारे अन्य संशयितांचा शोध घेतला गेला. तथापि, इतरांमध्ये तशी लक्षणे न आढळल्याने आरोग्य विभागाचा जीव भांड्यात पडला.
हेही वाचा >>>नाशिक: २५ टन लोखंडासह मालमोटारीची चोरी
मालेगाव, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील गोवरचा उद्रेक पाहता सर्व तालुक्यांत आशा, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने घरोघरी सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे. ताप, अंगावर पुरळ असणारे रुग्ण शोधले जात आहेत. आतापर्यंत तसे २१ संशयित आढळले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. येवल्यातील रुग्ण बरा झालेला असल्याने मालेगाव वगळता ग्रामीण भागात गोवरचा सध्या एकही रुग्ण नसल्याचे डॉ. नेहाते यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>नाशिक: रोहित पवार यांनी अभ्यास करावा – छगन भुजबळ यांचा सल्ला
मुंबईतील सर्वेक्षणात दाट वस्ती, लहान घरात बालकांची अधिक संख्या, कुपोषण, लसीकरण न करण्याची मानसिकता या कारणांनी गोवरची साथ पसरल्याचे उघड झाले. बालकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला गेला. गोवरचे प्रतिबंधक लसीकरण नऊ महिने ते पाच वर्ष या काळात दोन मात्रांद्वारे केले जाते. अनेक पालक बालकांचे लसीकरण करीत नाही. काही पहिली मात्रा घेऊन दुसरी मात्रा देत नाही. अशा वंचित राहिलेल्या बालकांना शोधून त्यांचे प्राधान्याने लसीकरणावर भर दिला गेला आहे.
१६३ वंचित बालकांचे लसीकरण
ग्रामीण भागात आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. जिथे अशी बालके आढळतात, तिथे लगेच मात्रा देण्याची व्यवस्था केली जाते. गेल्या तीन दिवसात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या ८१ मुलांना पहिली तर ८२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आल्याचे डॉ. हर्षल नेहाते यांनी सांगितले. लक्षणे व पुरळ असणाऱ्यांना वयोमानानुसार अ जीवनसत्वाची मात्रा दिली जात आहे.