लोकसत्ता वार्ताहर
धुळे: संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहराला पाणी पुरवठा होणारा नकाणे तलाव हरणामाळ तलावातील पाण्याने भरण्यात येत असून अक्कलपाडातील पाणी हरणामाळ तलावात आणण्यासाठी एक्स्प्रेस कालवा सज्ज करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांची पाहणी केली.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव, हरणामाळ तलाव तसेच अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यावरील गोताणे, उडाणे येथील पाझर तलावाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पाहणी केली. सद्यस्थितीत नकाणे तलावात कमी पाणीसाठा असल्यामुळे धुळ्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी हरणामाळ तलावातून नकाणे तलावात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे नकाणे तलावातील पातळी वाढली आहे.
हेही वाचा… जळगाव महापालिका शाळेत प्रौढ शिक्षणासाठी रात्रशाळा; जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना
हरणामाळ तलावाची पाणी पातळी कमी झाल्याने त्यात एक्स्प्रेस कालव्याव्दारे अक्कलपाड्याचे पाणी सोडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी गोयल यांनी उडाणे ग्रामस्थ, संबंधीत लोकप्रतिनिधी तसेच जलसंपदा कार्यालयातील अधिकाऱ्यांशी कालवा आवर्तन तसेच ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा केली. उजवा कालवा लाभक्षेत्रातील सर्व गावात पाझर तलाव व कालव्याद्वारे पुरेशा प्रमाणात आवर्तन चालू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सद्यस्थितीत उजव्या कालव्यावरील उडाणे तलाव भरला असून त्यापुढील सांजोरी नंतर कुंडाणे तलाव भरण्यात येईल. त्यानंतर एक्स्प्रेस कालव्याने हरणामाळ तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.