लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : शहर परिसरातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने तीन ठिकाणी गतीरोधक तसेच झेब्रा क्रॉसिंग करण्याविषयी महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. शहरात होणारे रस्ते अपघातांवर नियंत्रण यावे, यासाठी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने उपाययोजनांसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. याबाबत शहरातील गर्दीचे ठिकाण, शाळा, रुग्णालयानजीक तसेच काही अपघातप्रवणक्षेत्र निवडत त्या ठिकाणी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलण्यास सुरूवात झाली आहे.
आणखी वाचा-कांदा निर्यात बंदीप्रश्नी वरिष्ठ नेते केंद्रीय नेत्यांना भेटणार, दादा भुसे यांची ग्वाही
याबाबत नाशिक महापालिका तसेच स्मार्ट सिटी प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. अपघातप्रवण असलेला म्हसरूळ येथील जैन मंदिर परिसर, छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील मिरची चौकसह अजू एका ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगसह सिग्नल आदी व्यवस्था करण्यात येत आहे. याविषयी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त सचिन बारी यांनी, शहरातील या तीन ठिकाणी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. याशिवाय नागरिकांच्या मागणीनुसार गर्दीची ठिकाणे, रुग्णालय, शाळा या ठिकाणीही आवश्यकतेनुसार झेब्रा क्रॉसिंगसह इतर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.