नाशिक – राज्यातील प्रमुख धरणांमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट स्वरुपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रारंभी कोयना, जायकवाडी, गोसीखुर्द. उजनी अशा मोठ्या २५ ते ३० धरणांत ही उपकरणे बसविण्याचे नियोजन आहे.
जलसाठा, भूगर्भातील हालचाली आदींचा वेध घेण्यासाठी धरणात विविध प्रकारची उपकरणे कार्यरत असतात. मध्यंतरी धरण सुरक्षितता विभागाने प्रमुख धरणांमध्ये भूकंप मापनासाठी यंत्रणा उभारण्याची तयारी केली होती. तथापि, भूकंप मापनाचे काम भारतीय हवामान विभागाकडे आहे. या विभागाचे एक केंद्र महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या नाशिक मुख्यालयात आहे. धरण सुरक्षितता कायदा लागू झाल्यामुळे धरणांच्या आरोग्याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे धरण सुरक्षितता विभागाने प्राधान्यक्रम बदलला. भूकंपमापनाऐवजी भूकंपाच्या धक्क्यांमुळे धरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्याचा भविष्यातील धरणांच्या रचनेत उपयोग होईल. त्या अनुषंगाने भूकंपाच्या धक्क्यांचा धरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी त्वरणआलेखी उपकरणे (स्ट्राँग्र मोशन एक्सेलेरोग्राफ) बसविण्याचे निश्चित झाले. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जलविज्ञान आणि धरण सुरक्षितता विभागाचे मुख्य अभियंता सुदर्शन पगार यांनी दिली.
हेही वाचा >>>दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
प्रत्येक धरणात तळाशी, मध्यभागी आणि वरील भागात याप्रकारे प्रत्येकी तीन उपकरणे बसविली जातील. त्यामार्फत संकलित होणाऱ्या माहितीद्वारे भुकंपाच्या धक्क्यांनी धरणाच्या संभाव्य नुकसानीचा अभ्यास करता येईल. पहिल्या ट्प्यात राज्यातील कोयना, उजनी, जायकवाडी, गोसीखुर्द, भंडारदरा, गिरणा, हतनूरसह २५ ते ३० प्रमुख धरणांवर ही उपकरणे बसविली जाणार आहेत. अन्य धरणांत टप्प्याटप्प्याने ती बसविली जातील, असे धरण सुरक्षितता संघटनेने म्हटले आहे.