नाशिक : शहरातील रविवार कारंजा, अशोक स्तंभ, सीबीएस, सिटी सेंटर माॅलजवळील चौक अशा काही ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असली तरी वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांना सर्वाधिक त्रास व्दारका आणि मुंबईनाका चौकातील वाहतूक कोंडीचा होत आहे. यापैकी व्दारका चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी पुन्हा एक बैठक पार पडली असून याठिकाणचे वाहतूक बेट काढण्यासह इतर काही उपायांवर चर्चा करण्यात आली.
मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे हे दोन महामार्ग द्वारका चौकात एकमेकांना छेद देतात. त्यातच शहरातून सटाणा, मालेगाव, धुळे, जळगावकडे जाणारी वाहतूकही या चौकातूनच जाते. त्यामुळे या चौकात कायम वाहतूक कोंडी होत असते. या चौकातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आजपर्यंत अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. वेगवेगळे उपाय करुनही या कोंडीवर कायमस्वरुपी असा कोणताही उपाय यशस्वी झालेला नाही. काही दिवसांपासून द्वारका चौकात मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊ लागल्याने ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाची बैठक नुकतीच झाली.
बैठकीत सर्व्हिस रस्ता, रस्त्यावरील अतिक्रमण, बेट काढून रस्ता मोकळा करणे, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त डॉ. मयूर पाटील, वाहतूक शाखेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीत द्वारका चौकातील वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सर्वकष, सर्व घटकांचा विचार होऊन काही उपाय सुचविण्यात आले. यामध्ये द्वारका चौकातील बेट काढून रस्ता मोकळा करण्यात यावा, डाव्या बाजूने जाणाऱ्यांनी डाव्या मार्गिकेतून तर, उजव्या बाजूकडे जाणाऱ्यांनी उजव्या मार्गिकेत वाहने ठेवल्यास रहदारीस अडथळा होणार नाही, असाही एक मुद्दा मांडण्यात आला. चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, सर्व्हिस रस्ता मोकळा करणे, त्यावरील अतिक्रमण काढणे, असे उपाय सुचविण्यात आले. सारडा सर्कल ते नाशिकरोडपर्यंत उड्डाणपूल करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारडे विचाराधीन आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास व्दारका चौकातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे. चौकात पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग करण्यात आला असला तरी त्याचा वापर होत नाही. हा मार्ग पुन्हा सुरु करण्याची गरज आहे. धुळे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील आणि सर्व्हिस रस्त्यातील लोखंडी जाळ्या काढून टाकणे, दुभाजक कमी करणे, धुळ्याहून उड्डाणपुलावरुन येणारी वाहने द्वारका चौकात उतरतात. तसेच मुंबईकडून उड्डाणपुलावरुन येणारी वाहनेही द्वारका चौकात उतरतात. दोन्ही ठिकाणी झेब्रा पट्टा मारणे, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी व्यवस्था करणे, वाहनचालकांना मार्गदर्शनासाठी फलक लावण्यात यावेत, आदी उपाय सुचवण्यात आले.
भुयारी मार्गाचा उपयोग का नाही ?
व्दारका चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भुयारी मार्ग करण्यात आला होता. परंतु, या मार्गाचा पादचाऱ्यांकडून क्वचितच वापर झाला. कालांतराने तो बंदच करण्यात आला. हा मार्ग लहान वाहनांसाठी खुला केल्यास चौकातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. याशिवाय नाशिकरोड ते सारडा सर्कल उड्डाणपूल निर्मिती हा एक उपाय आहो. दरम्यान, वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांचीही जबाबदारी असून त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.