आयुक्तांकडून कामांबाबतचा लेखी खुलासा प्राप्त : महापौर महाजन
जळगाव – महापालिकेच्या आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी मंगळवारी बोलाविण्यात आलेली विशेष महासभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली. महासभेस अवघ्या चार-पाच सदस्यांची उपस्थिती होती. आयुक्तांनी कामांबाबतचा लेखी खुलासा सादर केल्याने, सदस्यांच्या गणपूर्तीअभावी विशेष महासभा तहकूब केल्याचे आणि हा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. दरम्यान, महासभेवेळी सदस्यांची आसने रिकामीच दिसून आली. सदस्यांपेक्षा अधिकार्यांची उपस्थित होती.
महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी सकाळी अकराला आयुक्तांविरोधातील अविश्वास प्रस्तावाविषयी चर्चेसाठी विशेष महासभा बोलाविण्यात आली. व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगर सचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
हेही वाचा >>> एरंडोल तालुक्यातील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द; सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती
भाजप नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासोबत पक्षाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख हेही आले होते. महासभा सुरू होण्यापूर्वीच अॅड. अश्विन सोनवणे, देशमुख व नगरसेविका अॅड. शुचिता हाडा यांची चर्चा सुरू झाली होती. डॉ. सोनवणे यांनी गणपूर्तीअभावी सहभाग तहकूब करावी, अशी मागणी केल्यावर अॅड. हाडा यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर महाजन यांनी आयुक्तांचा कामांबाबतचा खुलासा महासभेला प्राप्त झाल्याचे सांगितले आणि महासभा राष्ट्रगीताने आटोपती घेण्यात आली.
महापौर महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, काही नगरसेवकांनी महापालिकेसमोर आंदोलन केले होते आणि त्यांनी एकत्रित येऊन माझ्याकडे जवळपास ५६ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करावा, असे पत्र दिले. त्याअनुषंगाने महाराष्ट्र अधिनियम कायद्यानुसार विशेष महासभेचे नियोजन केले. त्यामुळे मंगळवारी विशेष महासभा बोलाविली होती. मात्र, महासभेला सदस्य उपस्थित राहिले नाहीत. आयुक्तांविरोधातील अविश्वास प्रस्ताव सादर केला होता, त्यासाठी कमीत कमी पाच अष्टमांशी अर्थात ४५ सदस्यांची आवश्यकता होती. मात्र, बोटावर मोजण्याएवढे चार ते पाच सदस्य उपस्थित होते. त्यामुळे गणपूर्ती न झाल्याने विशेष महासभेत कामकाज न झाल्याने आयुक्तांविरोधातील प्रस्तावावर निर्णय झाला नाही. हा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे. नगरसेवकांच्या उपोषण आंदोलनावर महापौर महाजन यांनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, नगरसेवक डॉ. सोनवणे यांच्या साखळी उपोषणाला माझा पाठिंबा नव्हता. मी आंदोलनस्थळी गेले नाही. मला असे वाटते की, कोणत्याही प्रश्नांसाठी, समस्यांसाठी संघर्ष किंवा आंदोलन करण्यापेक्षा चर्चेतून विषय सुटले असते. त्यावर मार्ग काढता आला असता. सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी व लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनातील अधिकार्यांनीही एकत्र येऊन चर्चा घडवून आणली असती, तर त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता. त्यामुळे माझा या आंदोलनाला पाठिंबा नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> नाशिक: अधिकमासामुळे त्र्यंबकच्या अर्थचक्राला गती; देवस्थानकडून देणगी दर्शन बंद
सोमवारी सायंकाळपासून घडलेल्या राजकीय घडामोडींबाबतही महापौर महाजन यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या नगरसेवकांच्या सायंकाळी झालेल्या बंदद्वार बैठकीत चर्चा झाली. चर्चेतून त्यांनी सारवासारव केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरसेवक विशेष महासभेला उपस्थित राहिले नसल्याचे दिसून येत आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील दोन्ही मंत्री नगरसेवकांच्या आंदोलनाबाबत अनभिज्ञ होते, ते त्यांनी स्पष्ट केले आहे. नगरसेवकांनी आंदोलन करताना आपल्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेणे फार मोठे गरजेचे असते. आगामी काळात नगरसेवकानगरसेवकांमध्ये काहीतरी दुरावा अथवा मतभेद निर्माण होतील. कारण, दोन दिवसांत बर्याच घडामोडी घडलेल्या आहेत. या प्रकरणात महापालिका प्रशासन आणि आयुक्त यादेखील नाराज झाल्या आहेत, तसेच काही नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर आहे, असेही त्या म्हणाल्या. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी, नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र, त्यांच्या उपोषण आंदोलनाला माझा पाठिंबा नव्हता, असे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील दोन्ही मंत्री अविश्वासाबाबत अनभिज्ञ
दरम्यान, आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव सोमवारी सायंकाळी मोठ्या घडामोडी घडत बारगळला आहे. नगरसेवकांनी आपल्याशी चर्चा न करताच अविश्वासाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मित्रपक्ष शिवसेनेला तो मान्यही नव्हता. त्यामुळे आयुक्तांविरोधात अविश्वास आणण्याची भूमिका भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली होती. शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात सोमवारी सायंकाळी भाजपचे मंत्री महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरसेवकांची बंदद्वार बैठक घेत चर्चा केली. त्यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनाही बोलाविण्यात आले होते. त्यानंतर मंत्री महाजन, पालकमंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापालिका आयुक्तांविरोधातील अविश्वासाबाबत भूमिका जाहीर केली. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे व आमदार मंगेश चव्हाण हेही उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी सांगितले की, आयुक्त डॉ. गायकवाड या विशिष्ट नगरसेवकांनाच झुकते माप देतात आणि इतर नगरसेवकांची कामे करीत नाहीत, असे आरोप करीत नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी शहरातील खड्डेमय रस्ते, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, कचर्याचे ढीग आदी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण केले होते. नगरसेवकांकडून आयुक्तांविरोधात अविश्वास आणण्याचा निर्णय अचानक घेतला गेला. त्याबाबतची माहिती आम्हालाही नव्हती. माहिती असती तर त्यावर तोडगा काढला असता. आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत नगरसेवकांकडून तक्रारी आल्या आहेत. नगरसेवक व आयुक्तांचे म्हणणे ऐकून घेतले असून, आयुक्तांनाही सूचना केल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांविरोधातील अविश्वास आणण्यात येणार नसल्याचेही ते म्हणाले. बैठकीस भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक मयूर कापसे, धीरज सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, जितेंद्र मराठे, मुकुंदा सोनवणे, रेश्मा काळे, नगरसेवक डॉ. सोनवणे यांच्यासह तब्बल वीसपेक्षा अधिक नगरसेवक उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. नगरसेवक डॉ. सोनवणे यांच्या नेतृत्वात आणि विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांच्या पाठिंब्याने झालेल्या साखळी उपोषणास शिवसेना शिंदे गटाचा अर्थात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठिंबा नव्हता, हे आता स्पष्ट झाले आहे. महापालिकेत शिवसेनेचे १३ सदस्य असून, पैकी नऊ सदस्य बाहेरगावी गेले होते. शिवसेना नगरसेवकांना या हालचालींत सहभागी न होण्याबाबत सांगण्यात आल्याचे समजते.