नंदुरबार – उमेदवारी अर्जावरून आणि त्यानंतर झालेले राजकारण आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच झाले असल्याचा आरोप नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. या विषयावर वेळ आल्यावर आपण बोलणारच आहोत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – राज्य काँग्रेसला अध्यक्षबाधा?
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात तांबे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी तांबे यांनी उमेदवारीवरून झालेल्या नाट्यमय घडामोडी मतदारांसमोर मांडल्या. आपण काँग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु, काही कारणास्तव निर्णय झाला नाही. काँग्रेसकडून आपण उमेदवारी अर्जही दाखल केले होते. मात्र, एबी अर्ज आपल्यापर्यंत न पोहचल्याने अपक्ष उमेदवारी झाली, असे त्यांनी सांगितले. मागच्या वीस वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून काम करत आलो आहे. आता मोठ्या व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून उमेदवारी केली आहे, असे तांबे म्हणाले.
मतदारांचे प्रश्न गंभीर आहेत. अपुरी शिक्षक, शिपाई, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या, भरती नसल्याने यंत्रणेवरील ताण, संस्थाचालकांचे मोठे प्रश्न आहेत. आज शाळा माजी विद्यार्थी आणि लोकसहभागावर सुरू आहेत, त्यामुळेच आगामी काळात यासाठी व्यापक काम करणार आहे. याच अनुषंगाने एप्रिल महिन्यात शिक्षक परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय इच्छाशक्ती असेल तर जुन्या निवृत्तीवेतनाचा मुद्दा सुटेल, अन्यथा हा मुद्दा आगामी काळात देशाच्या निवडणुकीचा मुद्दा होईल. शिक्षणावर सात टक्के खर्च करायला हवा, मात्र आपण अडीच टक्केच खर्च करत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्यजित तांबे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले