लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यात काँग्रेसमधील एकेक मोठे नेते बाहेर पडत असतानाही त्याचा कोणताही परिणाम होऊ न देता स्थानिक पातळीवर पदाधिकारी निवडणुकीची तयारी करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रस्तरीय (बूथ) समित्या सक्षमीकरण आणि हर घर राहुल, हर घर काँग्रेस अभियानांतर्गत बैठकांचे आयोजन केले जात आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर राज्यातील पक्षाचे काही आमदार, नेते पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या पक्षांतराची चर्चा होत आहे. सध्या खोसकर हे परदेशात आहेत. परतल्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठवाड्यातील अशोक चव्हाण यांचा पक्षीय कामकाजानिमित्त स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क येत असे. परंतु, त्यांच्यासाठी कुणी काँग्रेसला सोडचिठ्ठी देईल, अशी स्थिती नसल्याचे सांगितले जाते. चव्हाण यांच्या भूमिकेने पक्षात अस्वस्थता पसरली असून हे सावट दूर करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपले बैठकीचे सत्र कायम ठेवले आहे. काँग्रेसच्या मध्य नाशिक ब्लॉकच्या बैठकीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लक्षणीय आघाडी मिळवून देत काँग्रेस इतिहास घडवल्याशिवाय राहणार नसल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा-गोदा महाआरतीवरून संघर्ष शिगेला; अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे शासन, प्रशासनाला पत्र
नाशिकमधील पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करून केंद्रस्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून हर घर राहुल, हर घर काँग्रेस हे अभियान राबविण्यात येणार आहे. याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेसचा विचार, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता घेऊन जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस, माजीमंत्री शोभा बच्छाव यांनी शहरातील विधानसभेच्या किमान दोन जागांवर काँग्रेस जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे यांनी कार्याचा अहवाल सादर करुन नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल ठेवत संघटना बांधणी करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, सिराज कोकणी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गामणे, माजी नगरसेविका सुचिता बच्छाव, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर आदी उपस्थित होते.