अमृता फडणवीस यांचा सवाल
नाशिक : आज आपण मासिकपाळीकडे कटकट म्हणून पाहतो. त्यासाठी महिन्याचे चार दिवस वाया घालवणार असू तर महिला सक्षमीकरण, समानता या मुद्दय़ांवर बोलण्याचा आपणास काय अधिकार? असा प्रश्न उपस्थित करून मासिकपाळी ही नैसर्गिक प्रकिया असून तिचा आनंदाने स्वीकार करा, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिरात बुधवारी अहिल्या फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने ‘संकल्प स्त्रीत्वाच्या सन्मानाचा, तिचे आरोग्य -तिच्या निरोगी जीवनाचा’ हा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी फडणवीस बोलत होत्या.
गेलमार्क कंपनीच्या आर्थिक मदतीने जिल्ह्य़ातील १०६४ शाळांमधील दीड लाख विद्यार्थिनींना १० लाख सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनेतील चार हजार कर्मचारी यात सहभागी झाले होते. या उपक्रमाची नोंद लंडन येथील वंडर बुक ऑफ लंडन संस्थेने घेतली आहे.
‘बेटी को आगे बढाव’ साठी प्रयत्न होणे गरजेचे असून मासिक पाळीमुळे आरोग्यविषयक काही अडचणी निर्माण होत असताना किशोरवयातच मुलींना याबाबत योग्य ती माहिती दिली गेली पाहिजे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
शेफाली भुजबळ यांनी मासिक पाळी या विषयावर उघडपणे बोलणे गरजेचे असून त्यातून अनेक प्रश्नांचा गुंता सुटेल याकडे लक्ष वेधले. सुप्रिया जाधव या चिमुकलीने हा उपक्रम लहान मुलींसाठी कसा महत्त्वाचा ठरेल याविषयी विचार मांडले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी या उपक्रमाची सखोल माहिती दिली.
कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आ. देवयानी फरांदे, आ. दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित, अनिता सावंत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या महिला सभापती, लोकप्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते.
‘संकल्प स्त्रीत्वाच्या सन्मानाचा’ कार्यक्रमात आदिशक्तीला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. मोहिनी भुसे हिने संबळ वादन करीत देवीला वंदन केले. फडणवीस यांच्या हस्ते शहर तसेच जिल्हा परिसरातील विद्यार्थिनीना प्रातिनिधिक स्वरूपात पॅड आणि स्वच्छताविषयक प्रसाधने वितरित करण्यात आली. शहरातील व्ही.एन.नाईक, एस.एम.आर.के. महिला महाविद्यालय, के. टी. एच. एम. महाविद्यालयास वेडिंग यंत्र देण्यात आले. स्पर्धामध्ये यश मिळविणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींचा फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसाठी अशीही सरबराई.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस येणार म्हणून महाकवी कालिदास कलामंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांवर दुभाजक टाकण्यात आले. रस्ता वाहतुकीसाठी बंद न ठेवता काही अंशी त्यावर निर्बंध घालण्यात आले. कलामंदिरात येणाऱ्यांची तपासणी, कलामंदिराच्या आवारात सुरक्षारक्षक, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, बाऊन्सर अशी त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था नेमण्यात आली.