लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणासाठी मुख्यत्वे लाकडी फळ्या, बांबूंचा (बॅरिकेंटींग) सर्वत्र वापर केला जातो. भाविकांची गर्दी थोपवणे आणि टप्प्याटप्प्याने त्यांना सोडणे या प्रक्रियेत गर्दी वाढल्यास हे अडथळे तग धरू शकत नाहीत. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडू शकते. आगामी सिंहस्थात अशा घटना घडू नयेत यासाठी धातूंचा वापर वा तत्सम मजबूत अडथळे उभारण्याचा विचार करावा, अशी सूचना गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात डॉ. चहल यांनी सिंहस्थ कुंभमेळा यनियोजनाचा आढावा घेतला. प्रयागराज येथे मौनी अमावास्येनिमित्त शाही स्नानावेळी चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. २००४ मधील नाशिकच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. आगामी कुंभमेळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकडे गृह विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कुठे घडल्या, त्याची कारणे काय होती, नाशिकमधील २००४ मधील दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या रमणी आयोगाच्या शिफारसी, यांचा एकत्रित अभ्यास करून त्यानुसार नियोजन करावे, असे चहल यांनी सूचित केले. गर्दी नियोजनासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पाहणी करावी, भक्कम अडथळे उभारण्यासाठी संबंधित व्यावसायिकांशी संवाद साधावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभमेळा दुर्घटनारहीत, सुरक्षित होण्यासाठी गर्दी नियंत्रणाचे सूक्ष्म नियोजन करावे. साधूग्रामच्या आवश्यक जागेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे चहल यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कुंभमेळ्यातील कामांना गती देण्याचे निर्देश दिले असून त्यांचा नियमितपणे आढावा घेतला जात असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनिषा खत्री, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांकडून लवकरच आढावा
आगामी कुंभमेळ्यासाठी कमी कालावधी राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व विभागांनी आपापल्या कामांना गती द्यावी. त्यासाठी सांघिक भावनेने काम करावे. मुख्यमंत्री लवकरच कुंभमेळ्यातील विविध कामांचा आढावा घेणार असल्याचे अपर मुख्य सचिव डॉ. चहल यांनी सांगितले. घाट, नदीपात्राची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट याचेही नियोजन करावे. गर्दी नियोजनासाठी स्वयंसेवकांची मदत घेता येईल का, याची पडताळणी करुन त्याचेही नियोजन पोलीस दलाने करावे. सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कामांचे प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना डॉ. चहल यांनी केली.