नाशिक : जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील वातावरणात लक्षणीय बदल झाले असून हवामान विभागाने २६ ते २८ डिसेंबर या तीन दिवसांत नाशिक, जळगावमधील काही भागात गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत. सध्या ढगाळ वातावरणात बोचरे वारे वहात आहेत.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर, सटाणा मार्गावरही आता शिवाई बससेवा
नाशिकमध्ये पुन्हा एकदा वातावरणात कमालीचा बदल झाला. सायंकाळनंतर गारवा वाढत असून धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. ढगाळ हवामान, पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी सलग काही दिवस थंडीची लाट आली होती. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर परिणाम झाला. मागील दोन, तीन दिवसांत चित्र पूर्णत: बदलले. मंगळवारी शहरात १५ अंश तापमानाची नोंद झाली. मागील आठवड्याचा विचार करता तापमानात सहा अंशांनी वाढ झाली. थंडीचा जोर ओसरला असला तरी बोचरे वारे गारव्याची अनुभूती देत आहेत. पहाटे सर्वत्र धुके पसरते. दाट धुक्यामुळे सकाळी वाहनधारकांना दिवे लावून मार्गक्रमण करावे लागते. ढगाळ वातावरणात सूर्याचे अधूनमधून दर्शन घडते. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहील. पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी त्यानुसार कामांचे नियोजन करावे, असे सूचित करण्यात आले आहे. मध्यंतरी दोन दिवस अवकाळी पाऊस झाला होता. त्याची सर्वाधिक झळ द्राक्षबागांना बसली. सध्या बागलाणसह कळवण, मालेगाव, देवळा या भागात द्राक्ष काढणी प्रगतीपथावर आहे. तयार द्राक्षबागांना पावसाची झळ बसू शकते.