नाशिक : नागरिकांना लिहिता वाचता यावे, खऱ्या अर्थाने लोक साक्षर व्हावेत, यासाठी राज्य शासनाने प्रौढ साक्षरता अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात २०११ च्या नोंदीनुसार २५ हजारांहून अधिक निरक्षर आहेत. या निरक्षरांपैकी प्रौढ साक्षरता अभियानातंर्गत साक्षर होण्यासाठी धडपड करणाऱ्यांची शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या ७१ टक्के राहिली. कामानिमित्ताने स्थलांतर करणारे अनेक जण ही परीक्षा देऊ शकले नाहीत.
शिक्षण विभागाच्या वतीने प्रौढ साक्षरता अभियानाच्या माध्यमातून सर्वांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत २०११ च्या जनगणनेनुसार केंद्रस्तरावरून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक निरक्षर आहेत. या निरक्षरांचा शोध घेण्याची जबाबदारी प्रत्येक शाळेतील दोन ते तीन शिक्षकांवर सोपवण्यात आली. वास्तविक, शिक्षकांवर मराठा-कुणबी आरक्षण नोंदी, निवडणुकीची कामे यांसह अन्य अशैक्षणिक कामांची जबाबदारी देण्यात आली असताना निरीक्षकांसमोर जिल्ह्यातील निरक्षरांचा शोध कसा घ्यायचा, ही समस्या होती. ज्या शिक्षकांवर निरक्षरांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी त्यातून पळवाटा शोधल्या. काही जणांनी आहे तीच यादी पुढे सरकवली. काहींनी ओळखीच्या लोकांना निरक्षर दाखवत शिक्षित केल्याचे सांगितले. वर्ग घेतलेच गेले नाहीत. विशेष म्हणजे, ही सर्व माहिती आभासी पध्दतीने संकेतस्थळावर भरायची होती. ती माहिती संकेतस्थळावर टाकता आली नाही. गटविकास अधिकारी किंवा अन्य लोकांना ही माहिती देता आली नाही.
हेही वाचा...आचारसंहितेमुळे विद्रुपीकरणातून मुक्तता; २० हजारहून अधिक राजकीय फलक, भित्तीपत्रके, झेंडे हटवले
रविवारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या केंद्रावरून २५ हजाराहून अधिक जणांनी साक्षरतेसंदर्भातील परीक्षा दिली. याविषयी प्रौढ साक्षरता अभियानचे प्रकाश अहिरे यांनी माहिती दिली. काहींनी कामानिमित्त गुजरात येथे स्थलांतर केले होते, काही बाहेरगावी गेले होते. जिल्ह्यात ७१ टक्के लोकांनी परीक्षा दिली. परीक्षा देणाऱ्यांमध्ये बागलाण, पेठ, मालेगाव, देवळा या तालुक्यांतील ९० टक्केपेक्षा अधिक लोकांचा सहभाग राहिला. प्रौढ साक्षरता वर्गाविषयी कुठल्याही तक्रारी आल्या नसल्याचे आहिरे यांनी नमूद केले. नाशिक जिल्ह्यात प्रौढ साक्षरता अभियानातंर्गत शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेली परीक्षा ७१ टक्के जणांनी दिली.
हेही वाचा…नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी
परीक्षेचे महत्व काय ?
प्रौढ साक्षरता अभियानातंर्गत साक्षरतेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्या प्रगतीचा अंदाज या परीक्षेमुळे आला. जिल्ह्यात परीक्षेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक जण कामाच्या शोधात गुजरातमध्ये गेल्याने तसेच काही जण बाहेरगावी गेल्याने परीक्षा देऊ शकले नाहीत. बागलाण, पेठ, मालेगाव, देवळा या तालुक्यांतील ९० टक्केपेक्षा अधिक लोकांनी ही परीक्षा दिली. प्रौढ साक्षरतेची नवीन आकडेवारी उपलब्ध होण्यासाठीही या परीक्षेचे महत्व होते.