नाशिक: सध्या शिवसेनेत कोण राहील, कोण सोडेल, कोण शिल्लक राहील हे सांगता येत नाही. सेनेत मिलिंद नार्वेकर हे नाराज आहेत. त्यांचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध असल्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मनसेतर्फे मुंबईत आयोजित दीपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीनही नेते एकत्र आले होते. याबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर महाजन यांनी खरेतर हा धार्मिक कार्यक्रम असून त्याकडे राजकीय दृष्टीने बघण्याची गरज नसल्याचे नमूद केले.

मनसे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकाच विचाराचे आहेत. सर्वाचे ध्येय एकच आहे. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांनी दिवाळीसारख्या धार्मिक सोहळय़ात एकत्र येण्यात गैर काहीही नाही. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते, असे सांगत महाजन यांनी राज्यात नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले.राजकारणात काहीही अशक्य नसते. तीन वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप एकत्र लढले. नंतर सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. अडीच वर्षांनी त्यांची काय फजिती झाली ते सर्वानी बघितले, असा दाखला त्यांनी दिला.