बनावट गुंतवणूक कंपनी स्थापून पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत काही गुंतवणूकदारांना लाखोंना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने परदेशात कंपनी खरेदी करण्याचा बनाव रचून हे पैसे उकळले.
नाशिक जिल्ह्य़ात याआधी अनेक प्रकरणांमध्ये हजारो गुंतवणूकदारांची कोटय़वधींची गुंतवणूक अडचणीत सापडली आहे. वारंवार हात पोळले जाऊनही गुंतवणूकदार बळी पडत असल्याचे या घटनेतही दिसून आले. संशयित प्रदीप वाघ याने नाशिकमध्ये कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांची ५० लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मूळचा नाशिकचा पण सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. संशयिताने ओळखीचा फायदा घेत शिंगाडा तलाव येथे वास्तव्यास असणाऱ्या हुकूमत डिमोचल वालेचा यांना कंपनीत काही भाग व रोख रक्कम गुंतवण्यास सांगितले. वालेचा व त्यांची बहीण प्रीती वाधवा यांनी पैसे दामदुप्पट होतील म्हणून पैसे गुंतवले. यात जवळपास ५० लाख रुपयांचा अपहार संशयिताने केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुंतवणूक मिळविण्यासाठी संशयिताने बनावट फर्म उघडून अबूथनान इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. (वेस्ट अफ्रिका) येथील कंपनी खरेदी करावयाची असल्याचे भासविले. इतकेच नव्हे तर, हाँगकाँगच्या ब्राइट सिनो इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीचा मालक असल्याचे खोटे सांगून बनावट कागदपत्रे दाखविली. आपल्याकडे गुंतवणूक केल्यास महिनाभरात रक्कम दुप्पट करून परतावा दिला जाईल, असे आमिष दाखविले. या प्रकरणात आणखी काही गुंतवणूकदार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.