महिला सक्षमीकरणासाठी राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र या योजनेचा गैरफायदा घेत महिलांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकरण सिडकोमध्ये उघडकीस आले आहे. महिला बचत गटाच्या नावाखाली कर्ज मंजूर करून देण्याची बतावणी करत महिलांना साडेअकरा लाख रुपयांना फसवणूक केल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सिडको येथील संशयित वहिदा इब्राहिम खानने कामटवाडे परिसरातील कल्पना महाले यांना महिला बचत गटाचे सदस्य होण्याची गळ घातली. बचत गटाच्या सदस्य झाल्यावर तुम्हाला बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. तसेच कर्ज मंजूर न झाल्यास पैसे परत केले जातील, अशी बतावणी वहिदा यांनी केली. जून २०१५ मध्ये वहिदाने फिरदोस कॉलनीतील आपल्या घरी बचत गटातील कल्पना महालेसह अन्य पाच ते सहा महिलांना बोलावून काही रक्कम घेतली. कल्पना यांच्याकडून ४५ हजार रुपये घेत तुमचे पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असे सांगत त्या रकमेचा धनादेश दिला. कल्पना यांनी धनादेश बँकेत जमा केला असता तो वटला नाही. वहिदाच्या खात्यात पैसे उपलब्ध नसल्याने धनादेश बाद झाला. त्यामुळे कल्पना यांनी वहिदाकडे पैशांची मागणी केली. पैसे परत करण्याऐवजी वहिदाने पैसे परत मागितल्यास तुम्ही मला पैशांसाठी त्रास देतात, अशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. वहिदाने बचत गटातील सदस्या सुलताना शेख यांचे तीन लाख रुपये, स्मिता नाईक यांचे दोन लाख, मीराबाई बेलदार यांचे दीड लाख, उर्मिला गायकवाड यांचे तीन लाख ७५ हजार, रंजना राजपूत यांचे ७० हजार व कल्पना यांचे ४५ हजार असे एकूण ११ लाख ४० हजार रुपये घेऊन कोणताही मोबदला न देता फसवणूक केल्याचे उघड झाले. अनेकदा पैशाची तक्रार करूनही संबंधित महिला पैसे परत करत नसल्याने अंबड पोलीस ठाण्यात वहिदाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. परंतु, संशयित वहिदाला सबळ पुराव्याअभावी अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा