आगामी काळात राज्यात दलित, मुस्लिम आणि ओबीसी बांधवांना एकत्रित करून ‘एमआयएम’ पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाणार आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत पक्षाने लक्षणीय यश संपादित केले. आता एमआयएम नाशिक महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने तयारी करत असल्याचे आ. इम्तियाज जलील यांनी सांगितले.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात झाला. यावेळी आ. जलील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.
या दोन्ही पक्षांनी दलित व मुस्लिम मतांवर राजकारण केले. प्रदीर्घ काळ सत्ता भोगूनही काँग्रेस आघाडीने आमची झोळी रिकामी ठेवली. तथापि, पुढील काळात एमआयएम तसे होऊ देणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दलित, मुस्लिम व ओबीसी एकत्र आल्यास सत्ता हस्तगत करणे अवघड नाही. काँग्रेस आघाडीच्या मंत्र्यांनी सत्ता काळात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्यांनी आता तुरुंगात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे जलील यांनी सांगितले.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे २६ उमेदवार विजयी झाले.
नाशिक पालिकेची निवडणूक दीड वर्षांने होत आहे. त्या अनुषंगाने तयारी करून अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.