* ‘तोपची’मध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिके
* पंतप्रधानांच्या हस्ते धनुष, सारंग तोफखान्यात समाविष्ट होणार
१५५ एमएम होवित्सर एम ७७७, स्वयंचलित के – ९ वज्र या आधुनिक तोफांच्या जोडीला १५५ एमएम बोफोर्स, १०५ एमएम इंडियन आणि लाइट फील्ड गन (सोल्टन) आणि १२० एमएम मॉर्टर या तुलनेत जुन्या तोफांनी आपापली प्रहारक क्षमता सिद्ध केली. प्रत्येक तोफेने डागलेले गोळे अवघ्या २० ते ४५ सेकंदांत लक्ष्यावर धडकले. आधुनिक आणि जुन्या तोफांच्या मिलाफाने तोफखाना दलाची प्रहारक क्षमता अधिकच वृद्धिंगत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यास निमित्त ठरले, तोफखाना स्कूलच्या वतीने मंगळवारी आयोजित ‘तोपची’ या प्रात्यक्षिकांचे. तोफांचा भडिमार, लाँचरमधून लक्ष्यभेद करणारी रॉकेट्स, लष्करी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सचे जमिनीलगत भ्रमंतीचे कसब यामुळे देवळालीच्या फायरिंग रेंजला जणू युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. फेब्रुवारीच्या अखेरीस तोफखाना दलाच्या भात्यात नव्याने स्वदेशी बनावटीच्या धनुष आणि सारंग या दोन नवीन तोफा समाविष्ट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम देवळाली कॅम्प येथील तोफखाना स्कूलमध्ये करण्याचे नियोजन प्रगतिपथावर असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तोपची सोहळा देवळालीच्या फायरिंग रेंजवर वेलिंग्टनच्या डिफेन्स सव्र्हिस स्टाफ महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल व्ही. के. मोहन, तोफखाना स्कूलचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर. एस. सरालिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी पुणे आणि अहमदनगर येथील टेक्निकल स्टाफ ऑफिसर्स कोर्सचे प्रशिक्षणार्थी, नेपाळचे लष्करी शिष्टमंडळ उपस्थित होते. तोफखाना दलाच्या कामगिरीने नेपाळचे लष्करी शिष्टमंडळ चकित झाले. स्कूलच्या वतीने दरवर्षी या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येते. देवळाली कॅम्पलगतच्या फायरिंग रेंजवर सलग दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात तोफखाना दलात नुकतीच समाविष्ट झालेली हलक्या वजनाची होवित्सर एम ७७७ आणि स्वयंचलित के ९ वज्र या तोफा प्रमुख आकर्षण होत्या. परंतु ३० ते ४० वर्षे जुन्या असणाऱ्या बोफोर्स, मॉर्टर, इंडियन फील्ड गन आणि लाइट फील्ड गन या तोफांनी सडेतोड कामगिरी करत आपले महत्त्व अधोरेखित केले. एकाचवेळी ४० रॉकेट डागण्याची क्षमता असणारे १२२ एम. एम. मल्टी बॅरल रॉकेट लाँचर आणि रुद्र, ध्रुव आणि चिता हेलिकॉप्टर्सच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले.
तोफखाना दलाकडील वेगवेगळ्या आयुधांची ओळख आणि क्षमता या निमित्ताने अधोरेखित करण्यात आली. प्रात्यक्षिकात रशियन बनावटीचे स्मर्च आणि पिनाका रॉकेट्सचे सादरीकरण करण्यात आले. त्यांचे प्रात्यक्षिक या रेंजवर शक्य नव्हते. लष्करी हेलिकॉप्टरने अगदी जमिनीलगत भ्रमंतीचे कौशल्य दाखवले.
तोफखाना दलाच्या टेहळणी आणि लक्ष्य निश्चिती विभाग अर्थात सव्र्हिलन्स आणि टारगेट अॅक्विझिशन विंग (साटा) कडून वापरल्या जाणाऱ्या लोरोज, एएनटीपीक्यू यासारख्या टेहळणी यंत्रणा, वैमानिकरहित विमाने, हवामानाची माहिती देणारे रडार आदी प्रदर्शनात सादर करण्यात आले.
नव्या तोफांनी क्षमता वाढणार
बोफोर्सनंतर तोफखाना दलात नव्याने तोफा समाविष्ट झाल्या नव्हत्या. जुनाट तोफांवर दलास काम चालवावे लागले. गेल्या वर्षी हलक्या वजनाची होवित्सर आणि के ९ वज्र या तोफा संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांच्या उपस्थितीत लष्करात समाविष्ट करण्यात आल्या. या तोफांपाठोपाठ आता धनुष आणि सारंग या स्वदेशी बनावटीच्या तोफा समाविष्ट होत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या लष्कराकडे सुपूर्द केल्या जातील. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत या तोफांची देशांतर्गत बांधणी करण्यात आली आहे. लष्करी सामग्रीसाठी परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकली जात आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेली चाचणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर या तोफा तोफखाना दलाच्या ताफ्यात समाविष्ट होतील.
अल्पावधीत सज्जता
बिनतारी यंत्रणेद्वारे संदेश मिळाल्यानंतर सहा तोफा विशिष्ट ठिकाणी नेऊन गनर्स अर्थात गोलंदाज हल्ल्यासाठी सज्ज झाले. पाचव्या मिनिटाला विविध बनावटीच्या तोफांनी एकच भडिमार सुरू केला. त्यास ‘अग्नी वर्षांव’ असे म्हटले जाते. यामुळे फायरिंग रेंजचा डोंगर परिसर धुराने वेढला गेला. वेगवेगळी क्षमता असणाऱ्या तोफा एकाच वेळी लक्ष्यावर अचूक मारा करू शकतात हे पाहायला मिळाले. तोफखाना दल अल्पावधीत कशा पद्धतीने हल्ल्यासाठी सज्ज होऊ शकते, ते दाखवण्यात आले.
नाशिक येथे तोफखाना स्कूलतर्फे आयोजित कार्यक्रमात तोफांच्या प्रहारक क्षमतेचे दर्शन घडविण्यात आले. तोफगोळा आणि रॉकेट्सच्या भडिमारामुळे फायरिंग रेंजला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते.