नाशिक : डिसेंबरच्या अखेरीस दरवर्षीप्रमाणे पारा खाली घसरत असून मंगळवारी हंगामातील ८.४ अंश या निचांकी तापमानाची नोंद झाली. थंडीचा तडाखा कमालीचा वाढल्याने सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. गारव्याची सुखद अनुभूती मिळत असली तरी करोनाकाळात मात्र ती धास्ती देखील वाढवत आहे.

उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव नाशिकच्या तापमानावर पडतो. मागील काही हंगामातील नोंदी पाहिल्यावर डिसेंबर, जानेवारीत कडाक्याची थंडी पडते. या काळात तापमान निचांकी पातळी गाठते. यंदाचा हंगाम त्यास अपवाद ठरला नाही. २०१९ च्या हंगामात २८ डिसेंबरला ११.५ तर जानेवारी २०२० ला सर्वात कमी म्हणजे ६.५ अंश या निचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्याआधीच्या हंगामात म्हणजे २०१८ च्या हंगामात २९ डिसेंबरला त्या हंगामातील निचांकी ५.१ अंश तापमानाची नोंद झाली होती. तीन दिवसांपूर्वी गारव्याचे अस्तित्व जाणवू लागले. आदल्या दिवशी ९.१ अंश हे हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले. दुसऱ्या दिवशी त्यात पुन्हा घसरण होऊन नव्या निचांकी पातळीची नोंद झाली. वातावरणात कमालीचा गारठा पसरला असून दिवसाही त्याची प्रकर्षांने जाणीव होते. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक आहे. उबदार कपडय़ांपासून ते शेकोटय़ांपर्यंत आधार घेतला जात आहे.

घटत्या तापमानाची धास्ती

मागील काही दिवसांत शहरात करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाली. प्रतिदिन १५० ते २०० दरम्यान असणारा आकडा आदल्या दिवशी २७१ वर पोहोचला आहे. बदलत्या हवामानात खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गारव्यात सर्दी, खोकल्याचे विकार बळावतात. हवामान झपाटय़ाने बदलल्याने अनेकांना त्याची जाणीव होत आहे. त्यामुळे  या सर्व परिस्थितीत घटणाऱ्या तापमानाची धास्ती आहे.

Story img Loader