नाशिक – समृध्दी महामार्गाचे काम निश्चित वेळापत्रकानुसार होत आहे. महामार्गाचा सिन्नरपुढील टप्पा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होईल. मे २०२४ पर्यंत वडपेपर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गाच्या कामात घाई गडबडीचा विषयच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री दादा भुसे यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> धुळ्याचे आयुक्त भाजपचे पदाधिकारी आहेत काय? – राष्ट्रवादीची टीका

महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी येथे आलेले नाशिकचे पालकमंत्री भुसे यांनी शहापूर तालुक्यात समृध्दी महामार्गावरील क्रेन अपघातानंतर सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांवर भाष्य केले. समृध्दी महामार्गाच्या कामात सिंगापूरची यंत्रणा वापरली जात आहे. या भागातील पुलावर ११५ ते १२० कॉलम आहेत. त्यापैकी ९४ कॉलमचे काम या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण झाले होते. केवळ १६ कॉलमचे काम बाकी असताना ही घटना घडली. उच्च तंत्रज्ञान व मोठी क्षमता असलेले काम संबंधित कंपनी करीत आहे. दिवसा व रात्री काय काम करायचे याचे नियोजन त्यांच्यामार्फत केले जाते. या यंत्रणेच्या वापरातून आजवरचे काम झाल्याकडे भुसे यांनी लक्ष वेधले. हा अपघात कशामुळे झाला, याचा निश्चितपणे शोध घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> नाशिक : गंगापूर रोड परिसरात बिबट्या जेरबंद

रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान जो पूल तयार केला जाणार आहे, त्यावर कॉलम ठेवण्याचे काम सुरू होते. हे कॉलम खांबांवर ठेवण्यासाठी जी यंत्रणा आहे, ती कोसळल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त ठिकाणी आणखी एक-दोन जण अडकले असण्याची शक्यता असून एनडीआरएफ व ठाण्यातील बचाव पथक क्रेनचे साहित्य मोकळे करून त्याची खातरजमा करीत आहे. सामग्री हाताळताना क्रेनचा उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांशी संपर्क आल्याची साशंकता व्यक्त होत आहे. या प्रश्नावर त्यांनी उच्च दाबाच्या वाहिन्या पाठीमागील स्लॅबवर असल्याचे नमूद केले. त्याच्या पुढील टप्प्यात क्रेन होती. जिथे काम सुरू होते, तेथील उच्च दाब वाहिनी ही मृत आहे. उच्च दाबाच्या जिवंत वाहिनीच्या खालील काम यापूर्वीच झालेले असल्याचे भुसे यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister dada bhuse claims about samruddhi highway project work schedule zws