जळगाव – तुमच्या एका जिल्ह्यातील वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरजच नाही. आमदार रवी राणांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत, असे आवाहन शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मंत्री पाटील यांनी आमदार बच्चू कडू यांची बाजू घेत राणांना चांगलेच सुनावले.
जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी मंत्री पाटील यांनी संवाद साधला. विदर्भातील वाद आता राज्यभर पसरल्याचे चित्र दिसून येत असून, शिंदे गटाची चांगलीच कोंडी होत आहे. अपक्ष आमदार असलेले रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा >>>नाशिक : जरा धीर धरा, आपले दिवस परत येतील – छगन भुजबळ यांचे शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादाविषयी बोलताना गुलाबरावांनी रवी राणा यांनी जे वक्तव्य केले आहे, ते अत्यंत चुकीचे असून, एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे, असे सांगितले. कोणी विकावू नाही, या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे; पण तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरजच नाही. राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाहीत, तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल. चाळीस वर्षांचे करिअर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावा, तसेच दोघांनाही शांत करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करतो, असेही मंत्री पाटील म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बच्चू कडू यांची समजूत घातली पाहिजे आणि या विषयावर पडदा पाडला पाहिजे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>>जळगाव – अमृतसरच्या तरुणाचा भुसावळमधील रेल्वे यार्डात मृतदेह
बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. रवी राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देत बच्चू कडूंनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही ओढले. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर करावे, असे थेट आव्हानच बच्चू कडूंनी दिले होते. यानिमित्ताने शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आल्याचे पाहावयास मिळत आहे. बच्चू कडू यांच्याप्रमाणेच शिंदे गटातील आमदारदेखील रवी राणांच्या वक्तव्यावर आक्षेप घेऊ शकतात, तसे झाल्यास शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.