जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षत्र पाहून निर्णय घेणारे नेते आहेत. ते राहू-केतुची स्थिती लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांना योग्यवेळी काय शिक्षा द्यायची ती देतील, असा दावा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. आदित्य यांच्याकडे आता झाडे वाचवण्याची किंवा मोठी आंदोलने करण्याची कोणतीही भूमिका उरलेली नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपला चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी, या भेटीबद्दल आदित्य यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांबरोबर आदित्य ठाकरे यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. फडणवीस-आदित्य भेटीचे नेमके कारण काय, यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे नक्षत्र पाहून काम करणारे नेते असल्यामुळे ते राहू- केतुची स्थिती पाहतील आणि त्यानंतर त्यांना काय शिक्षा द्यायची ती वेळेवर बरोबर देतील, असे आपल्या खास शैलीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली.

हे ही वाचा… नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार

याशिवाय, मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवरही भाष्य केले. देवकर हे ज्या पक्षात जातील, त्याच पक्षावर शिंतोडे उडवतील. त्यांनी जळगाव जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे घेतले, पण ते अद्याप फेडलेले नाहीत. मजूर फेडरेशनच्या माध्यमातून मजुरांचे पैसे घेऊन कर्ज घेतले. त्यांच्या नावावर एवढा भ्रष्टाचार असतानाही कुणाला त्यांना पक्षात घ्यायचे असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत. घरकूल प्रकरणातील शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे देवकर सध्या त्यांच्या घरी निवांत आहेत. मात्र, आपण त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याच्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत, असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.

Story img Loader