जळगाव – महायुती सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातील भाजपचे दोन आणि शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) एक मंत्री समाविष्ट असताना, शिंदे गटाचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची जळगावच्या पालकमंत्रीपदावर वर्णी लागली. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे सलग तिसऱ्यांदा हाती घेणारे पाटील हे पहिलेच मंत्री असून, अशी संधी यापूर्वी जिल्ह्यातील राजकारणात कोणालाच मिळालेली नाही. त्यामुळे मंत्री पाटील हे खऱ्या अर्थाने नशीबवान ठरले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीत ११ पैकी पाच मतदारसंघात भाजपच्या बरोबरीने यश मिळविल्यानंतर जळगावच्या पालकमंत्रीपदावर शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवला होता. दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांनीही आपण पालकमंत्री बनण्याच्या स्पर्धेत असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली असताना, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनाच जळगावचे पालकमंत्रीपद देण्यात आले. जिल्ह्याच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा पालकमंत्री होण्याचा विक्रम त्यामुळे मंत्री पाटील यांच्या नावे नोंदवला गेला आहे.
हेही वाचा – नंदुरबारमध्ये पोलिसांवर दगडफेकप्रकरणी १८ जण ताब्यात
२००९ चा अपवाद वगळता गुलाबराव पाटील हे प्रारंभी एरंडोल आणि नंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून १९९९ पासून सातत्याने निवडून येत आहेत. ते २०१६ मध्ये तत्कालिन महायुतीच्या सरकारमध्ये पहिल्यांदा सहकार राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपदासह जळगावचे पालकमंत्रीपद सांभाळण्याचा बहुमान मिळाला. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मंत्री पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्याचेच फळ म्हणून त्यांच्याकडे पाणीपुरवठा खाते व जळगावचे पालकमंत्रीपद कायम राहिले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाचव्यांदा विजयी झाल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये अपेक्षेनुसार पाटील यांना पाणीपुरवठा खात्याचे मंत्रिपद आणि त्यानंतर आता पालकमंत्रीपद तिसऱ्यांदा सोपविण्यात आले आहे. सरकार कोणतेही असो, कॅबिनेट मंत्रिपदासह जळगावचे पालकमंत्रीपद आता गुलाबराव पाटील यांच्यासाठी निश्चित झाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड असलेले भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनाही ते आजपर्यंत शक्य झालेले नाही, हे विशेष.
हेही वाचा – नाशिक : लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात
जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मला तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासाने मिळाली आहे. मागील पाच वर्षांत या जिल्ह्यात तीन मंत्री असले, तरी पालकमंत्रीपद माझ्याकडेच होते. त्याकाळात केलेली विकासकामे लक्षात घेऊन महायुतीकडून मला ही जबाबदारी पुन्हा दिली गेली आहे. – गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री, जळगाव)