अवघ्या काही दिवसात कांद्यांचे गडगडलेल्या दरामुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या रोषाला सोमवारी रात्री नवनिर्वाचित मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांना तोंड द्यावे लागले. बागलाण तालुक्यातील चिराई येथे एका कार्यक्रमात राणे भाषणासाठी उभे राहिले असता त्यांच्या गळ्यात अचानक एका शेतकऱ्याने कांद्यांची माळ घातली. ध्वनिक्षेपकावर संबंधित व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कांद्याची माळ घालणारी व्यक्ती कांदा उत्पादक असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा >>> छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, माणिक कोकाटे यांची भावना
मागील १० दिवसांपासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल सुमारे दोन हजार रुपयांनी कमी झाले. २० टक्के निर्यात शुल्कामुळे दरातील घसरण थांबत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. ही अस्वस्थता सोमवारी मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यात उघड झाली. बागलाण तालुक्यातील चिराई येथे श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदयात्रेनिमित्त फिरता नारळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रात्री नऊ वाजता राणे यांनी हजेरी लावली. या ठिकाणी बोलण्यासाठी ते उभे राहिले. त्याचवेळी व्यासपीठावर अकस्मात एक शेतकरी आला. त्याने काही कळण्याच्या आत कांद्याची माळ राणे यांच्या गळ्यात घातली.
हेही वाचा >>> परभणी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, अमित शहा यांच्याविरुद्धही घोषणा
मंत्री राणे यांनी त्यास विरोध केला नाही. या शेतकऱ्याला थांबवा, त्यांच्या समस्या ऐकून घेऊ, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्याने ध्वनिक्षेपकावर बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. व्यासपीठावरून बाजूला हटवले. पोलीस बंदोबस्त तैनात असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.