लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नाशिकसह मराठवाडा, विदर्भात द्राक्ष, संत्री, कलिंगड, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेत लांबलचक भाषणे ठोकायला वेळ आहे. मात्र, त्यांच्यासह इतर मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्यास, त्यांना आधार देण्यास वेळ नाही, असे टिकास्त्र ठाकरे गटाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी सोडले. खेडमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेत गर्दी जमविण्यासाठी ठाण्यासह अनेक भागातून वाहने बोलावली गेली. एक हजार रुपये आणि बिर्याणीचे पाकीट घ्या अन कोकणात फिरायला चला, असे सांगून गर्दी जमविल्याचा दावा त्यांनी केला.
शिवगर्जना अभियानांतर्गत २६ मार्च रोजी मालेगाव येथे उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी मालेगाव येथे जाताना खासदार राऊत यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अवकाळीने बिकट स्थिती ओढावली असताना शासनाच्या उदासीनतेकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यात निफाड, देवळा, कळवण, चांदवड, बागलाण आदी भागात अवकाळीचा फटका बसला. द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. चार दिवसांपूर्वी सिन्नर येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के भरपाई देण्याचे भाषणात जाहीर केले होते. परंतु, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नुकसानीचे पंचनामे देखील होऊ शकलेले नाही. मग भरपाई कधी देणार, बैल गेला, झोपा केला असा हा प्रकार असल्याचे राऊत यांनी सांगितले. खेडमधील उत्तर सभेवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. लिहिलेली संहिता वाचताना समोरून लोक कंटाळून उठून गेले तरी त्यांना दिसत नाही. शासनातील एकही मंत्री नुकसानीची पाहणी करण्यास बांधावर गेला नाही, हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा- अनिल जयसिंघानीला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत आणलं होतं? आदित्य ठाकरे म्हणाले…
आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा नाशिकहून मुंबईकडे गेला. आमच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना पाणी, नाश्ता देऊन माणुसकीचा धर्म पाळला. पाच दिवस चालल्याने ताण येऊन एका मोर्चेकऱ्याचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकायला, त्यांना मदत करायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. खोके वापरून इतर पक्षातील लोकांना कसे आणू शकतो यातच ते मग्न आहेत. नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याची आता गरज नाही. चोवीस तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी सिन्नरच्या सभेत दिलेल्या शब्दानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँकांऐवजी राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घ्यायला सांगते. तथापि, या बँका गरजवतांना ताटकळत ठेवतात, हे सर्वज्ञात आहे. पैसा असूनही केंद्र, राज्य शासन आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी कर्जाचे पुनर्गठन न करता शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काठण्यासाठी ठोक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते.