लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : पवननगर भागातील लकी गिफ्ट स्टोअरमध्ये एका आठ वर्षाच्या मुलास अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणात अंबड पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगा सायंकाळी पवननगर येथील लकी गिफ्ट स्टोअरमध्ये वही खरेदीसाठी गेला होता. त्यावेळी अनावधानाने तेथील काही पुस्तके खाली पडली. यामुळे संतप्त दुकान मालक जमादार अन्सारीने मुलाला पादत्राणाने मारहाण केली. घरी परतलेल्या मुलाच्या पाठीवर आणि तोंडावर व्रण आढळून आल्याने मुलाच्या वडिलांनी जाब विचारण्यासाठी दुकान गाठले. त्यावेळी अन्सारीसह त्याच्या साथीदारांनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. धमकीही दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
आणखी वाचा-नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अन्सारीसह इतर संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.