मुलीची बदनामी का करतो? याबद्दल विचारणा केल्याचा राग येऊन संशयित तरुणाने मायलेकीला मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पेठ रस्त्यावर घडली. या प्रकरणी विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरारी झालेल्या अजय नेटावडे (राहुलवाडी)या संशयिताचा शोध घेत आहेत. संशयित शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्याने तिची बदनामी केली. हे लक्षात आल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी संशयित अजयला जाब विचारला असता त्याने मायलेकीला शिवीगाळ करत मारहाण केली. मुलीचा विनयभंग केला. दरम्यान, विनयभंगाची दुसरी घटना ध्रुवनगर परिसरात घडली. खेळत असणाऱ्या नऊ वर्षीय बालिकेचा किशोरवयीन युवकाने विनयभंग केला. पोलिसांनी संशयित बालकाला ताब्यात घेतले. घराबाहेर खेळत असणाऱ्या बालिकेला संशयिताने अडगळीच्या जागेत बोलावून तिचा विनयभंग केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारीच्या काचा फोडून चोरी
वेगवेगळ्य़ा ठिकाणी उभ्या केलेल्या दोन वाहनांच्या काचा फोडून चोरटय़ांनी कारटेपसह लॅपटॉप चोरून नेला. पहिली घटना टकलेनगर परिसरात घडली. या संदर्भात अनिल कुलथे (स्नेह अपार्टमेंट, जवेरी खानचंद धर्म शाळेसमोर) यांनी तक्रार दिली. त्यांची बोलेरो सोसायटीच्या वाहनतळात लावली असताना चोरटय़ांनी वाहनाची काच फोडून म्युझिक सिस्टीम आणि रिव्हर्स डिस्प्ले असा सुमारे १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना जेहान चौकालगतच्या नेर्लेकर रुग्णालय परिसरात घडली. धनंजय संधान (पुणे) हे साईछाया अपार्टमेंटमध्ये मुक्कामी थांबले होते. चोरटय़ांनी सोसायटीच्या वाहनतळात लावलेल्या त्यांच्या मोटारीच्या दरवाजाची काच फोडून लॅपटॉप असलेली बॅग लंपास केली. बॅगमध्ये लॅपटॉपसह महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे २० हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून सोन्या-चांदीचे नाणे लंपास
कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरटय़ांनी भरदिवसा केलेल्या घरफोडीत सोन्या- चांदीचे नाणे चोरून नेल्याची घटना अशोका मार्गावर घडली. या संदर्भात प्रदीप उगराणी (विहीतगाव, लॅमरोड) यांनी तक्रार दिली. अशोका शाळेमागील हरिस्नेहा सोसायटीत राहणारे गुरू रत्नाकर महाराज हे गाणगापूर येथे गेल्याची संधी साधत चोरटय़ांनी बंद सदनिकेचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याची दोन आणि चांदीचे एक नाणे असे २१ हजारांचे नाणे चोरून नेले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.