एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप निवडणुकीपुरतेच मर्यादित राहावेत, कोणतीही कटुता मनात न ठेवता आणि राजकीय भेदभाव विसरून नाशिकसह जिल्ह्य़ाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र काम करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची ‘मिसळ पार्टी’ येथे चर्चेचा विषय झाली आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना ‘मिसळ पार्टी’च्या निमित्ताने एकत्र आणले. सर्वानी मिसळीवर ताव मारत गप्पांची मैफल रंगविली आणि राजकीय अभिनिवेष दूर सारून शहर तसेच जिल्ह्य़ाच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा मानस व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी ‘मिसळ पार्टी’ चे आमंत्रण सर्वच राजकीय पक्ष-अपक्ष उमेदवारांना दिले. आमंत्रणाचा स्वीकार करत शिवसेना, भाजप, अपक्ष उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी पार्टीला हजेरी लावली. राजकीय जोडे बाजूला ठेवत निवडणुकीतील गंमती-जंमती, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटीत आलेले अनुभव, दुष्काळाची भीषणता, कार्यकर्त्यांच्या गमती यावर चर्चा झाली.
अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांनी निवडणुकीत आपण अपक्ष असलो तरी प्रचारात निवडणुकीची मजा घेतल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप होत राहतात. पक्षाच्या विचारप्रणालीनुसार प्रत्येक जण वागत असतो.
त्या काळातील ही कटुता दूर करत सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी व्यक्त केले. तर आमदार सीमा हिरे म्हणाल्या, निवडणुकीच्या काळात प्रचार करतांना मनात दुसऱ्या राजकीय पक्षाविषयी कटुता येते. ही कटुता जाण्यासाठी मिसळ पार्टी उत्तम माध्यम आहे. सर्व एकत्र येतात, अनुभवांची देवाण-घेवाण होते आणि यातून सुसंवाद साधला जातो. या मिसळ पार्टीस आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, अजय बोरस्ते, गुरुमीत बग्गा, नाना महाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.