नाशिक – बकरी ईदनिमित्त शहरात लागलेल्या एका शुभेच्छा फलकावर नाशिकऐवजी जाणीवपूर्वक झालेला गुलशनाबादचा उल्लेख चुकीचा आहे. कोणी खोडसाळ प्रवृत्ती डोके वर काढत असून संबंधितांवर पोलीस कारवाई करतील, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी संकेत दिले.

बकरी ईदच्या दिवशी सारडा सर्कल भागात हा शुभेच्छा फलक लागल्याचे सांगितले जाते. त्यावर नाशिकचा उल्लेख गुलशनाबाद केल्यावरून समाज माध्यमांवर तीव्र पडसाद उमटत आहेत. मुहंमद सुफियान रजा फ्रेंड्स सर्कल यांच्यातर्फे हा फलक लावण्यात आल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात आल्यावर तो फलक त्वरीत हटविला गेला. या संदर्भात शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री भुसे यांनी भूमिका मांडली. फलकावरील उल्लेखाची बाब कानावर आली आहे. नाशिकचा उल्लेख जाणीवपूर्वक गुलशनाबाद करणे योग्य नाही. हा चुकीचा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले. काही खोडसाळ प्रवृती डोके वर काढत असल्याचे भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा – नाशिक : विम्यासाठी वाहनाचा अपघात होऊन मद्यसाठा चोरीस गेल्याचा बनाव; सहा संशयितांसह मुद्देमाल ताब्यात

ठाकरे गटातर्फे एक जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर भुसे यांनी मागील काळातील काही गोष्टी समोर येत असून त्यांची चौकशी सुरू झाल्याने त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे गटाचा हा मोर्चा असल्याचे सांगितले.

हेही वाचा – मनमाड पोलिसांकडून ४५ जनावरे ताब्यात

लोकशाहीत मोर्चा काढणे व आपले म्हणणे मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो, अशी पुस्ती त्यांनी जोडली. विरोधी पक्षनेते अजित पवार हे नैराश्यातून मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका करीत असल्याचा आरोप भुसे यांनी केला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या कामाच्या धडाक्यात मित्रपक्षांनाही दूर सारले गेले होते. राज्यात विकास कामांना गती देण्यासाठी शिवसेना-भाजपा सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.