नाशिक – चारचौघींसारखा संसार करण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवत सासरचा उंबरा ओलांडलेल्या नववधूच्या अचानक बेपत्ता होण्याने तिच्या कुटुंबियांवर संकट ओढावले होते. मात्र, नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी १४ दिवसांत तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे तिला शोधून पतीच्या ताब्यात सुखरूप सोपवले.
मूळ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा मुंबईत राहणाऱ्या युवकाशी विवाह झाला. पती, सासू आणि इतर नातेवाईकांबरोबर नववधू नाशिक येथे देवदर्शनासाठी आली होती. २० फेब्रुवारी रोजी देवदर्शन आटोपून मुंबईला जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकात सर्वजण आले असता नववधू दिसेना. पतीने नाशिकरोड रेल्वे पोलिसांकडे पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार आशा मोरे, गुन्हे शोध पथकाचे सहायक उपनिरीक्षक संतोष उफाडे यांनी एकत्रित तपास सुरू केला. उफाडे यांनी अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करत नववधूचा इन्स्टाग्राम आयडी आणि व्हॉट्सअॅपद्वारे ठावठिकाणा शोधला. तिच्याशी संवाद साधत तिला पोलीस ठाण्यात येण्यास प्रवृत्त केले.
पाच मार्च रोजी नववधू पोलीस ठाण्यात हजर झाल्यावर तिच्या पतीला बोलावून तिला त्याच्या ताब्यात देण्यात आले. अधिकाऱ्यांनी दोघांचे समुपदेशन करत संसारातील लहानसहान अडचणींना तोंड देण्याचा सल्ला दिला.